दोघावर हल्ला केलेला बिबट्या पसार, नागरिक व शेतकऱ्यांचे टेंशन वाढले

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : कुष्णूर औद्योगिक वसाहतीत दोघावर हल्ला केलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने शनिवारी ट्रँप कँमेरे व पिंजरा लावला होता. वन विभागाची टिम रात्रभर पाळत ठेवली होती मात्र दि.२९ रोजी ११.३० च्या दरम्यान तो पसार झाला. बिबट्या पसार झाल्याने सावरखेड, बरबडा, अंतरगाव परिसरातील शेतकरी व नागरिकांचे टेंशन वाढले आहे.
नायगाव तालुक्यातील कुष्णूर औद्योगिक वसाहतीतील मेधावी पाईप कारखान्यात काम करणाऱ्या श्रीकांत पपूलवाड या कर्मचाऱ्यावर शनिवारी दि. २९ रोजी ३.३० वाजताच्या दरम्यान बिबट्याने अचानक पाठीमागून हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्याने घाबरलेल्या पपूलवाड यांनी आरडाओरडा करत पळ काढला. त्यांच्यावर घुंगराळा येथे उपचार करण्यात आले. सदरच्या घटनेची माहिती वन विभागाला कळवण्यात आली. कुष्णूर सारख्या वसाहतीत बिबट्या आल्याने वन विभागही अँक्शन मोडवर आला आणि तातडीने यंत्रणा हलली व काही वेळातच ट्रप कँमेरे, पिंजरा, बेहोश करणारी गण घेवून पथक हजर झाले.
ज्या कंपणीत कर्मचाऱ्यावर बिबट्याने हल्ला केला तो कुठे दबा धरुन बसला आहे याचा शोध घेण्यात येत असतांनाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने वन विभागाचे चालक असलेले गुलाब जाधव यांच्यावरही हल्ला केला. या हल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सावधपणे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी ज्या ठिकाणी बिबट्या दबा धरून बसला त्याच्या आजुबाजुला शेकोटी पेटवून रात्रभर पाळत ठेवले पण वन विभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला नाही. शनिवारी रात्री ११.३० च्या दरम्यान बिबट्या पसार झाला. तो वन विभागाच्या पथकासमोरुनच सावरखेड, बरबडा व अंतरगाव भागात गेला. तो पुढे नदी ओलांडून जाण्याचीही शक्यता वन विभागाने वर्तवली आहे.
सध्या रब्बीचे दिवस असून शेतकऱ्यांनी हरभरा, टाळकी ज्वारी व गहू पेरले आहेत तर दुसरीकडे कालव्याला पाणी आले असल्याने शेतकरी दिवसरात्र शेतात पाणी देण्याचे काम करत आहेत. बिबट्या वन विभागाच्या तावडीत सापडला नसल्याने शेतकऱ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे शेतीच्या आखाड्यावर जणावरेही असतात या जणावरांचे संरक्षण करण्याची अतिरिक्त जबाबदारी वाढली आहे. पायी जाणाऱ्या किंवा मोटारसायकलवरुन जाणाऱ्या नागरिकावर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना इतर ठिकाणी घडल्या आहेत त्यामुळे कुष्णूर परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
बिबट्याचा पहील्यांदाच हल्ला…
नायगाव तालुक्यात तेवढ्या मोठ्या प्रमाणात वनसंपदा नसल्याने हरणांचा मुक्त वावर असतो पण बिबट्या किंवा हिंस्त्र प्राण्यांचा वावर आजपर्यंत नव्हता. परंतु कालच्या घटनेने बिबट्या पहील्यांदाच नायगाव तालुक्यात अवतरला आहे. कुष्णूर घटनेची तालुकाभर चर्चा झाल्याने शनिवारी रात्री ग्रामीण भागातील नागरिकांनी शेतात पाणी देण्याचे टाळले. त्याचबरोबर वन विभागानेही काही गावात जावून शेतकरी व नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.
कुष्णूर औद्योगिक वसाहतीत बिबट्याने हल्ला केल्यानंतर समाज माध्यमातून बिबट्यासह पट्टेदार वाघांच्या व्हिडीओ क्लिक व्हायरल झाल्या. पण यातील एकही व्हिडीओ क्लिप किंवा फोटो बिबट्याचा नव्हता. कारण बिबट्या ज्या कंपणीच्या आवारात दबा धरून बसला होता त्याचे चित्रिकरण किंवा फोटो काढताच आले नाही. परंतु काहींनी उत्साहाच्या भरात दुसरीकडे व्हिडीओ व फोटो व्हायरल करुन अधिक भितीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला.



