चिमुकल्या अभिराजने वाचवले तीन वर्षांच्या बालकाचे प्राण ; ईगल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक

प्रकाश महिपाळे
नायगाव :– शिक्षण आणि संस्कारांची सांगड घालणाऱ्या रातोळी येथील ईगल इंग्लिश स्कूलच्या एका विद्यार्थ्याने आपल्या जीवाची पर्वा न करता एका लहान बालकाचे प्राण वाचवून शौर्याचा आदर्श घालून दिला आहे. चि. अभिराज संदीप पाटील रातोळीकर याच्या या धाडसी कार्याचे सध्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सर्वत्र सामसूम असताना अभिराज काही कामानिमित्त बाहेर गेला होता. त्याच वेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याने भरलेल्या एका टाकीमध्ये तीन वर्षांचा एक लहान मुलगा पडल्याचे अभिराजच्या निदर्शनास आले. रस्त्यावर मदतीसाठी कोणीही नसताना आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, अभिराजने क्षणाचाही विलंब न लावता धाडस दाखवले. त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या बालकाला टाकीतून सुखरूप बाहेर काढले. अभिराजच्या या समयसूचकतेमुळे एका मोठ्या अनर्थाची टाळला असून त्या चिमुकल्याचे प्राण वाचले आहेत.
अभिराजच्या या अंगावर शहारे आणणाऱ्या धाडसाची माहिती मिळताच ईगल इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी त्याचे विशेष कौतुक केले. “केवळ पुस्तकी ज्ञान न देता सामाजिक भान आणि परोपकाराची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हेच आमच्या शाळेचे ध्येय आहे, ज्याचे ज्वलंत उदाहरण अभिराजने सादर केले आहे,” अशा भावना शाळेकडून व्यक्त करण्यात आल्या.
सोशल मीडियावरही अभिराजच्या या धाडसी कृत्याचे फोटो व्हायरल होत असून, त्याच्या समजूतदारपणाचे आणि धैर्याचे परिसरातून अभिनंदन होत आहे.



