गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

कुंटूर पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड : आठ जुगाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंद ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : तालुक्यातील दुगाव जवळील एका शेतात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर कुंटूर पोलिसांनी धाड टाकून आठ आरोपींना अटक केली तर आठ हजाराच्या रोख रक्कमेसह ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र या धाडीत कुंटूर पोलिसांनी रोख रक्कम गायब केल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक कितीही तंबी दिली तरी ग्रामीण भागात अवैध धंदे काही केल्या बंद व्हायला तयार नाहीत. कारण पोलीसांच्या वरकमाईचे साधन असल्याने अवैध धंद्याला बळ देण्याचे ते काम करतच असतात. त्यामुळे ग्रामीण भागात सर्व काही अलबेल सुरुच आहे. विशेष म्हणजे पोलीसांचे हात ओले करणाऱ्यावर कुठलीच कारवाई होत नाही दुसरीकडे पोलीसांशी अर्थपूर्ण चर्चा न करता अवैध धंदे करणाऱ्यावर मात्र कारवाईचे अस्त्र तर उगारण्यात तर येतेच पण ठळक प्रसिद्धीसाठीही खटाटोप केला जातो.

कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहेर बिटमध्ये येणाऱ्या दुगाव ते कोठाळा या शिवारामध्ये हनुमंत बुद्धाजी कदम यांच्या शेतातील शेडमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक खोले व त्यांच्या टिमने दि. २८ रोजी रात्री उशिरा जुगार अड्ड्यावर धाड टाकली. हनुमंत कदम, दत्ता हरी हंबर्डे, महादेव पांचाळ, प्रकाश कांबळे, संतोष वानखेडे, विजय जाधव, नागनाथ टोकरकरी, सुनील जाधव हे जुगार खेळत असताना आढळून आले पण पोलीस येताच यातील दोघे फरार झाले.

या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून रोख ८ हजार व दोन मोटरसायकलीसह ८८ हजार ५६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. मात्र धाड टाकली तेव्हा रोख रक्कम बरीच होती पण ती कुंटूर पोलिसांनी गायब तर केलीच पण एकाचाही मोबाईल जप्त केला नसल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker