कुंडलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत गावात ग्रामरक्षक दल स्थापन
◆ सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांची माहिती

कुंडलवाडी प्रतिनिधी :- कुंडलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या परिसरातील २७ गावांपैकी १४ गावांमध्ये पोलीस प्रशासना मार्फत ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात आले उर्वरित १३ गावात ग्रामरक्षक दल स्थापन लवकरच स्थापन होणार आहे.तसेच शहरी भागातही मोहल्ला कमिटी स्थापन होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक मस्के यांनी दिली आहे.
नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल व शहरी भागात मोहल्ला कमिटी स्थापन करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने कुंडलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या प्रत्येक गावामध्ये नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक मस्के यांनी दि.१८,१९ व २० आँगस्ट रोजी हज्जापूर, डौर, पिंपळगाव, चिरली, टाकळी, दौलापूर, कोटग्याळ, माचनूर, मोकली, हरनाळी, नागणी, मनुर, बामणी, संगम आदी गावांना भेटी देऊन ग्रामरक्षक दल स्थापन केले आहे.
या ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून तंटामुक्त गाव करणे, व्यसनमुक्त गाव करणे, अवैध धंदे मुक्त गाव करणे, दारुबंदी, आदी बाबत उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन करून विविध सूचना देण्यात आले आहेत. तर उर्वरित १३ गावांमध्ये दररोज भेटी देऊन ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात येणार आहे. उर्वरित सर्व गावांमध्ये दररोज भेटी देऊन ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात येईल तर शहरी भागात येत्या तीन दिवसांत मोहल्ला कमिटी स्थापन करण्यात येईल अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिपक मस्के यांनी दिली आहे.
यावेळी पोहेकाँ शंकर चव्हाण, पोहेकाँ माधव पाटील खतगावकर, रघुवीरसिंह चौहान, आदी पोलीस कर्मचाऱ्यासह गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.