मनरेगाचा संगणक चालक लाचलुचपतच्या सापळ्यात

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : किनवट पंचायत समितीमधील मनरेगाचा कंत्राटी संगणक चालक अविनाश विश्वनाथ भुरेवार (32) यास 3500 रुपयाची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. सदर प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
यातील तक्रारदार यांनी मौजे शिरपुर, ता.किनवट, जि.नांदेड येथील ग्रामपंचायत हद्दीतील मनरेगा अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे एकुण 7 मस्टर पंचायत समिती किनवट येथे सादर केले. सदर मस्टरवर पुढील कार्यवाही करणेकरीता आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रत्येक मस्टरचे 500 रूपये याप्रमाणे एकुण 3500 रूपयांची मागणी मागणी केली. सदरची रक्कम ही लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाली.
तक्रारदार यांना सदरची लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी दि. 16 आँगस्ट 2024 लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे याबाबत तक्रार दिली. नमुद तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेडकडून लाच मागणीची पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे 7 मस्टरचे पुढील कारवाई करणे करिता प्रत्येकी 500 रूपये याप्रमाणे 3500 रूपयाची पंचासमक्ष लाचेची मागणी केली.
त्यावरून करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी लोकसेवक अविनाश विश्वनाथ भुरेवार यांनी तक्रारदार यांचेकडून पंचायत समिती कार्यालय, किनवट, ता. किनवट, जि. नांदेड येथे पंचासमक्ष लाचेची रक्कम 3500 रुपये स्विकारतांना लाचेच्या रकमेसह मिळून आले. सदर कार्यवाहीत आरोपी लोकसेवकास ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन किनवट, जि.नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.