दिवाळी संपली तरी तालुक्यातील 19 हजार शेतकरी मदतीपासून वंचित : तलाठी व तहसील कार्यालयाचा अनागोंदी कारभार

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तलाठी आणि तहसील कार्यालयाच्या दुष्टचक्रात तालुक्यातील 19 हजार शेतकरी अडकले आहेत. त्यामुळे दिवाळी संपली तरी या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळालेले नाही. एकीकडे निसर्गाची अवकृपा तर दुसरीकडे नोकरशाहीच्या कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे महसूल विभागाबद्दल शेतकऱ्यात असंतोष वाढत आहे.

आँगष्ट सप्टेंबर महिण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नायगाव तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले परिणामी खरिप हंगामच वाया गेला. या अतिवृष्टीचा ५६ हजार ५५० शेतकऱ्यांना फटका बसला. अतिवृष्टीचा जबर फटका बसलेल्या शेतकऱ्यांना अर्थिक मदत देण्यासाठी शासनाने तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना अर्थिक मदत देवून दिवाळी गोड करण्याचे आश्वासन दिले होते.

सुरुवातील ई केवायसी ची अट घालण्यात आली होती नंतर ती रद्द करण्यात आली दुसरीकडे मात्र फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आली. शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढण्यास सुरुवात केली परंतु अप्रूवल देण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. परिणामी तलाठी आणि तहसील कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही.

शासनाच्या आदेशानुसार दिवाळीच्या अगोदर संपूर्ण शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड होणे आवश्यक होते मात्र ५६ हजार ५५० पैकी ४२ हजार ६८७ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या. त्यामुळे या शेतकऱ्यांच्यायला खात्यात शासनाची मदत गेली. मात्र यातील १३ हजार ८६३ शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. याद्या अपलोड करण्याची जबाबदारी तलाठ्याकडे होती परंतु या तलाठ्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने ते त्यांच्या सोईनुसार काम करत आहेत. शासनाची मदत लवकर मिळावी यासाठी त्याचबरोबर शेतकरी फार्मर आय डी साठी नोंदणी केली परंतु अप्रुवल देण्यात आले नसल्याने ५ हजार ४०० फार्मर आय डी प्रलंबित आहेत. तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि तलाठ्यांच्या या कामचुकार प्रकाराचा फटका अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे.
दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकरी शासनाची मदत मिळणे आवश्यक असताना तलाठी व तहसील कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे ही मदत मिळू शकली नाही. जे १९ हजार २६३ शेतकरी मदतीपासून वंचित आहेत त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी तहसीलदाराचे कुठलेच प्रयत्न नाहीत कारण तेच नियमितपणे व वेळेवर कार्यालयात येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकासह शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. शिल्लक राहीलेल्या शेतकऱ्यांना दिवाळी संपली तरी क्षदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यात महसूल प्रशासनाच्या विरोधात रोष वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याच्या आगोदर मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



