नायगाव तहसील कार्यालयातील बायोमेट्रीक यंत्रणा बंद
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : शासकीय कामात सुसूत्रता येण्यासाठी व कर्मचांना वेळेवर कार्यालयात येण्याची सवय लागावी यासाठी बायोमेट्रीक प्रणालीवर हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र नायगाव तहसील कार्यालयातील बायोमेट्रीक यंत्रणा कुठे धुळखात पडली याची कुणालाच माहिती नाही. या संधीचा फायदा तहसील कार्यालयातील कर्मचारी घेत असून ते त्यांच्या सोईनुसार येत असल्याने नागरिकांच्या कामाचा खेळखंडोबा होत आहे.
नायगाव तहसील कार्यालयातून ८८ गावांचा कारभार चालतो. पण या कार्यालयाचे कारभारी मनमानेल तसे वागत असल्याने कार्यालयातील शिस्त बेशिस्त झाली आहे यामुळे कुणाचा पायपोस कुणाला राहीला नाही. परिणामी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाटेल तेव्हा कार्यालयात येतात आणि जातात. कारण कधी आलात व कधी चाललात याची विचारणा करण्यासाठी कुणीच राहत नाही. हा सर्व प्रकार जिल्हाधिकांना माहिती असतांना त्यांनीही कानावर हात ठेवल्याने सर्वकाही अलबेल सुरु आहे.
राज्यात पाच दिवसाचा आठवडा ता.२९ फेब्रुवारी २०२० पासून लागू करण्यात आला. त्यानंतर राज्यातील काही अत्यावश्यक विभाग वगळून कार्यालयीन कामकाजाच्या वेळाही निश्चित करण्यात आल्या. त्यात सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी वेळ निश्चित करुन दुपारी १ ते २ या वेळेत फक्त अर्ध्या तासाची भोजन वेळ देखिल अंतर्भूत आहे. तर शिपायांना सकाळी ९.३० ते ६.३० अशी वेळ ठरवण्यात आली आहे. केंद्राच्या धरतीवर राज्यात पाच दिवसाचा आठवडा सुरु करण्यात आला. पाच दिवसाचा आठवडा सुरु होवून पाच वर्षाच्या वर कालावधी झाला पण आजपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहण्याची सवय लागली नाही.
कोरोना काळात बंद करण्यात आलेली बायोमेट्रिक हजेरी नंतर सुरु करण्याचे शासनाने आदेश दिले. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातूनही आदेश निघाले व बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली. यानुसारच वेतन अदा करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र नायगाव तहसील कार्यालयाने सर्व आदेश खुंटीवर टांगून ठेवले आहेत.
बायोमेट्रिक यंत्रणा धुळखात पडल्याने अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या सोईनुसार येतात. जवळपास सर्वच कर्मचारी सकाळी ११ च्या ऩतरच येतात आणि ५.३० च्या दरम्यान रफूचक्कर होत असल्याचे दररोजचेच चित्र आहे. हक्कासाठी नेहमीच शासनाशी दोन हात करणांऱ्या कर्मचाऱ्यांना कर्तव्याचा मात्र विसर पडल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील लाभार्थी व नागरिक विविध कामासाठी सकाळी लवकर कार्यालयात येतात पण संबधीत अधिकारी आणि कर्मचारी टेबलवर दिसत नसल्याने त्यांचा हिरमोड होत आहे. या गंभीर प्रकाराकडे लक्ष देवून तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यासाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
शासकीय वेळेत मोबाईल वापरण्यावरही शासनाने निर्बंध घातलेले आहेत. परंतु शासकीय कर्मचांना फोनचा मोह आवरताच येत नसल्याने ते दिवसभर मोबाईलमध्येच व्यस्त असतात त्यात काही महिला कर्मचारी तर मोठ्या आवाजात रिल पाहण्याचा आनंद कार्यालयातच घेताना दिसून येतात.
महसूल सहायकाची मनमानी…
जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकाऱ्यांशी मधूर संबध असलेला एका महसूल सहायकाची नायगाव येथे बदली झाली. मात्र तो बदलीनंतर कधीच वेळेवर कार्यालयात येत नाही. आल्यास टेबलवर बसत नाही. ८५/२ वाटणीपत्र, ४२ अ ब क ड यासह तलाठ्याकडून वर्ग झालेल्या प्रकरणातील विविध कामे वेळेत होत नाहीत. याबाबत अनेक तक्रारी होत असताना तहसीलदार त्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत.