मोटार सायकल चोरीचा नायगाव पोलीसांना एक महिन्यापासून अद्यापही तपास लागेना

मोरे मनोहर
किनाळा :- नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण यांचे दुःखद निधन झाले असता त्यांच्या अंत्यविधीसाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून अनेक मान्यवर नेते मंडळी मोठ्या संख्येने अंत्यविधीसाठी नायगाव येथे आले असता त्यांच्या या अंत्यविधीच्या ठिकाणी नांदेड जिल्हा परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड जिल्हा अधिकारी अभिजित राउत हे आपल्या शेकडो पोलीस कर्मचाऱ्यासह उपस्थित असताना या अंत्यविधीच्या ठिकाणावरून अंत्यविधीस आलेल्या एका पत्रकाराच्या मोटार सायकलची चोरी होऊन एक महिना उलटत आला मात्र या चोरीचा तपास लावण्यात नायगाव पोलिसांना अद्याप यश आले नसल्याने पोलिसांच्या या निष्क्रिय कार्यावर नायगाव तालुका पत्रकार संघात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सविस्तर माहिती अशी की.27 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अंत्यविधीसाठी नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून विविध पक्षातील अनेक मान्यवर नेते मंडळी नायगाव शहरात आली असताना या अंत्यविधीच्या ठिकाणी नांदेड जिल्हा परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राउत हे आपल्या शेकडो पोलीस कर्मचाऱ्यासह नायगाव येथे उपस्थित असताना अंत्यविधीस आलेल्या पत्रकाराची मोटार सायकल चोरट्यांनी लंपास केली या घटनेची रितसर माहिती नायगाव पोलिसांना कळवले असता अज्ञात चोरट्याविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेला एक महिना उलटत आला आहे.
नायगाव येथे खा.वसंतरावजी चव्हाण यांच्या अंत्यविधीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त असताना याच अंत्यविधीस आलेल्या किनाळा तालुका बिलोली येथील पत्रकार मनोहर जळबाजी मोरे यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र.एम.एच.26 ए.पी.7151 हि मोटार सायकल भरदिवसा शेकडो पोलीस नायगाव येथे उपस्थित असताना चोरट्यांनी लंपास केलेल्या मोटार सायकलचा एक महिन्यापासून तपास लावण्यात नायगाव पोलिसांना यश आले नसल्याने नायगाव पोलीस चोरीला गेलेल्या मोटार सायकलचा तपास लावतील का असा प्रश्न नायगाव तालुका पत्रकार संघाना पडला आहे.
नायगाव पोलीस ठाणे व शंकरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घातला असून नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक चोऱ्या झालेल्या असताना रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर येथे पोलीस स्टेशन पासून जवळच असलेले एटीएम मशीन फोडून सुमारे 20 लाख 43 हजार रुपये लंपस करण्यात चोरटे यशस्वी झाले आहेत यामुळे सामान्य व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.