ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

पूर्ण दिवस सुटी अथवा किमान 2 तास मतदानाला वेळ द्या : प्रशासनाचे कामगार आस्थापनांना निर्देश

अंकुशकुमार देगावकर

नांदेड : जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी अत्यावश्यक सेवेपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत आणि कामगारांपासून शेतमजूर, मेकॅनिक, वेटर या सर्वांना एक तर पूर्ण दिवसाची सुट्टी अथवा मतदान करण्यासाठी दोन तासाची सवलत द्या, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने सर्व कामगार आस्थापनांना दिले आहे.

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत आहे. नांदेड विधानसभा मतदान क्षेत्रात असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्‍यांना निवडणुकीच्‍या दिवशी बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी भरपगारी सुट्टी देण्‍याबाबत शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे.

ही सुट्टी सर्व आस्‍थापना, कारखाने, दुकाने, इत्‍यादीना लागू राहील. उदा.राज्‍य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्‍या या मधील आस्‍थापना, सर्व दुकाने व इतर आस्‍थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, नाट्यगृहे, व्‍यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्‍थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्‍या, शॉपिग सेंटर, मॉल्‍स,रिटेलर इ. अपवादात्‍मक परिस्‍थीतीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्‍यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्‍य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल.

मात्र त्‍याबाबत त्‍यांनी संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्‍याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्‍थापना मालकांनी घेणे आवश्‍यक राहील.

सर्व आस्‍थापना,कारखाने, दुकाने इत्‍यादींच्‍या मालकांनी, व्‍यवस्‍थापनाने या आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्‍यावी. मतदारांकडून मतदानासाठी योग्‍य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्‍त न झाल्‍याने मतदान करणे शक्‍य न झाल्‍याबाबची तक्रार आल्‍यास, त्‍यांच्‍या विरुध्‍द योग्‍य ती कारवाई करण्‍यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker