लोकप्रतिनिधींची उदासीनता : आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या वारसांना मदत कधी मिळणार ?

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या कायदेशीर वारसांना दहा लाखाची मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्या बाबत शासनाने दि. 5 सप्टेंबर रोजी निर्णय घेतला व रक्कमही वर्ग झाली. जिल्ह्यातील काही आमदारांनी आपापल्या मतदारसंघात मदत तातडीने वाटपही केली आहे. पण मागच्या एक महिण्यापासून आ. राजेश पवार मतदारसंघात फिरकले नसल्याने नायगाव तालुक्यातील मदत कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मराठा आरक्षणाच्या दरम्यान नायगाव तालुक्यात अनेकांनी आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्यांच्या वारसांना शासकीय मदत व शासन सेवेत सामावून घेण्याचा मुद्दा मुंबईतील उपोषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आग्रहाने उपस्थित केला होता. यावेळी शासनाने नियुक्त केलेल्या उपसमितीने तातडीने अर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनानुसार काल ( ता.५) सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री सचिवालयाने एक पत्र जिल्हाधिकारी नांदेड यांच्या नावे पाठवून मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या नांदेड जिल्ह्यातील २१ मयतांची यादी पाठवली असून. मयताच्या वारसांना प्रत्येकी १० लाख याप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीतून २ कोटी १० लाख रुपये मंजूर केले आहेत असे सदरच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
नायगाव तालुक्यातील संख्या सहा आहे यात प्रकाश व्यंकटी जाधव रा.रानसुगाव, तिरुपती रामचंद्र लांडगे, रा.मांडणी, राजेश बालाजी भाकरे रा.गडगा, सम्रत हनमंत जाधव रा.केदारवडगाव, भिवजी देविदास बेलकर रा.बळेगाव व आनंदा बळवंत शिंदे रा.कोलंबी ता.नायगाव अदी आत्महत्याग्रस्तांच्या कायदेशीर वारसांना ही मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील इतर आमदारांनी सदरची मदत तातडीने आणि मयतांच्या घरी जावून वाटप करत आहेत.
शासनाने अर्थिक मदत जाहीर केल्यानंतर ती मदत तातडीने संबधीत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे काम आहे. पण नायगाव मतदारसंघाचे आमदार मागच्या एक महिण्यापासून मतदारसंघात फिरकले देखील नाहीत. एवढा मोठा महापूर आला शेतकरी व नागरिकांचे अतोनात नुकसान झाले परंतु मतदारसंघात फिरकले नाहीत. उलट खा. रवींद्र चव्हाण यांनी तातडीने भेटी देवून नागरिकांना धिर देण्याचे काम केल तर पालकमंत्री दौरा केला पण या भागाचे आमदार अद्यापही फिरकले नाहीत. नायगाव वगळता इतर तालुक्यातील मयतांच्या वारसांना 10 लाखांचा निधी मिळत आहे पण नायगाव तालुक्यातील वारसांना कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
या भागाचे आमदार भाजपचे असल्याने मराठा समाजाच्या कोणत्याही कामाकडे ते कायमच कानाडोळा करत आले आहेत. कारण आजपर्यंत ते मराठा समाजाच्या मोर्चात कधीच सहभागी झाले नाहीत कि कुठली मदत केली नाही. त्यामुळे मराठा समाजाची होणारी प्रगती त्यांना पाहवत नसावी.
चंद्रकांत पवार होटाळकर, जिल्हाध्यक्ष : राष्ट्रीय मराठा महासंघ.
आ.राजेश पवार यांना मराठा समाजाबद्दल आपुलकीच नाही त्यामुळे सतत दुर्लक्ष करतात. मराठा समाजाच्या कुठल्याच आंदोलनात त्यांचा सहभाग नसतो, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या एकाच्याही कुटूंबीयांना भेट दिली नाही.
साई मोरे, तालुकाध्यक्ष : छावा मराठा संघटना.



