महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार, शिवसेना आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद मिळणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी ५ डिसेंबर ही तारीख जाहीर केली आहे. असे असतानाही मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अधिकृतरीत्या कोणाचेही नाव जाहीर करण्यात आले नाही.
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे.
महाराष्ट्राच्या महायुतीत भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे. या तिघांनी मिळून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शानदार विजय नोंदवला आहे. १३२ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर शिवसेनेने ५७ तर राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या आहेत.
आजही महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाबाबत साशंकता आहे. मात्र, महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे अजित पवारांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. अजित पवार म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा असेल, तर उपमुख्यमंत्रीपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाईल.
मंत्रालयाचे विभाजन कसे होणार?
महाराष्ट्रात भाजपचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकारमधील मंत्रिपदांची विभागणी कशी होईल, याबाबत वेगळी चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ६ आमदारांमागे एक मंत्रिपद देण्याच्या सूत्रावर सरकारमधील खात्यांच्या वाटपात मित्रपक्षांचा वाटा ठरविण्याचा विचार केला जाणार आहे.
त्यानुसार भाजपला २१ ते २२ मंत्रीपदे, शिवसेनेच्या शिंदे गटाला १० ते १२ आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाला ८ ते ९ मंत्रिपदे मिळू शकतात. महाराष्ट्रात मंत्रिपदाचा एकूण कोटा मुख्यमंत्री पदासह ४३ पेक्षा जास्त नसावा.