लेंडी प्रकल्पाच्या तळभरणीचे काम आजपासून थांबणार
खा.रवींद्र चव्हाण यांची मागणी जिल्हाधिकार्यांनी केली मान्य
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत लेंडी धरणग्रस्तांचे पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रकल्पाच्या तळभरणीचे काम तात्काळ थांबवा, या खासदार रवींद्र चव्हाण यांच मागणीला यश आले असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तळभरणीचे काम थांबवून पुनर्वसनाच्या कामाला गती देण्याचे आश्वासन गुरुवारी झालेल्या बैठकीत दिले आहे.
लेंडी धरणग्रस्तांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या दालनात खा.रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक झाली. यावेळी काही धरणग्रस्त गावांचे अद्याप पुनर्वसन झालेले नसताना तळभरणीचे काम सुरु असल्याची बाब खा.रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली. पुनर्वसनाच्या कामाला गती द्यावी आणि हे काम पूर्ण होईपर्यंत तळभरणीचे काम थांबवावे,अशी मागणी खा.चव्हाण यांनी केली.
खा.रवींद्र चव्हाण यांच्या मागणीला प्रतिसाद देत जिल्हाधिकार्यांनी शुक्रवारी जायमोक्यावर संबंधित अभियंत्यांना पाठवून 40 मीटरपर्यंतचे मुळ तळभरणीचे काम थांबविण्यात येईल, असे आश्वासन दिले. या बैठकीला माजी आ. हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, उपविभागीय अधिारी अनुप पाटील, वि.पा.तिडके, अनिल मोरे, आनंदराव चव्हाण, महावितरणचे भालचंद्र मोरे, एस.आर.पेंढारकर, एल.वाय.भोयर, अधिक्षक अभियंता अजय दाभाडे, सुरेश पंदिलवार, सुभाषअप्पा बोधने, बंडप्पा गंदिगुडे, बालाजी जाधव, संदीप अतनुरे, उमाकांत वाकडे, श्रीकांत पाटील, बालाजी होकर्णे, सुरज कांबळे, सुशील देशमुख यांच्यासह धरणग्रस्त गावातील नागरिक उपस्थित होते.