तहसीलदाराच्या आदेशाला तलाठ्यानी दाखवली केराची टोपली
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून त्याना आधार देण्यासाठी शासनाने अनुदान जाहीर केले. हे अनुदान शासनाच्या माध्यमातून थेट डीबीटी द्वारे शेतकऱ्यांना मिळावे यासाठी विशिष्ट क्रमांकाच्या आधारे केवायसी प्रक्रिया पार पाडावी लागते. तहसील कार्यालयामार्फत विशेष क्रमांकाची यादी गावातील कार्यालयातील दर्शनी भागात लावण्याचे शासनाचे आदेश आहेत. नायगाव तालुक्यातील मौजे देगाव येथील तलाठी शिवकुमार मंगनाळे यांनी एका खाजगी एजन्टामार्फत केवायसी करून प्रत्येकी पन्नास रुपये उकळले असल्याचे समोर आले.
याविषयीं लोकमत प्रतिनिधिने तहसीलदार गायकवाड यांना ही बाब लक्षात आणून देताच त्यांनी मंडळ अधिकारी आरु यांना याबाबत नोटीस काढण्याची तोंडी सूचना दिली अन उर्वरित शेतकऱ्यांची माहिती तात्काळ तहसील कार्यालयाकडे पाठवण्यास सांगितली मात्र संबंधित तलाठी यांनी तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली अन दुसऱ्या दिवशी तलाठी सज्जा कार्यालयाला तलाठी मंगनाळे यांनी विनापरवाना तबेतीचे कारण देत दांडी मारल्याचे खुद्द मंडळ अधिकारी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या अनुदानाचे महत्वाचे काम असताना सुद्धा बेजबादार असलेल्या तलाठी यांनी विनापरवाना दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तलाठी यांच्या बेजबाबदारपणा मुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहू शकतात. अशा बेजबादार तलाठ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.