रामतीर्थ ठाण्याच्या हद्दीतील नरसी चौकातून होणाऱ्या ओव्हरलोड वाळू वाहतुकीला कुणाचे अभय

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यातील ठाणेदारांची एक व्हिडिओ काँन्फरंस मिटींग घेतली. यावेळी त्यांनी सर्वच ठाणेदारांना कडक शब्दात तंबी देतांना कुठल्याच प्रकारचे अवैध धंदे खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला होता. मात्र या इशाऱ्याचा रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या ठाणेदारावर काहीच परिणाम झाला नाही. कारण आजही नरसी पारिसरातून दिवसरात्र अवैध मुरुमाची व ओव्हरलोड वाळूची वाहतूक सुरुच आहे. तर दुसरीकडे बिलोलीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वीच गठीत केलेले पथक कारवाई करण्याऐवजी मांडवली करत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी अवैध वाळू, मुरुमासह अवैध धंद्याचा मुद्दा उपस्थित केला आणि यावर आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी पालकमंत्र्याकडे करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्र्यांनी संबधीत यंत्रणेला सुचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील ठाणेदारांची एक व्हिडिओ काँन्फरंस घेत कुठल्याच प्रकारचे अवैध धंदे खपवून घेणार नसल्याचा कडक शब्दात तंबी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या तंबीनंतर फरक पडेल असे वाटत होते पण रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या ठाणेदारावर काहीही फरक पडला नाही. आजही नरसी परिसरातून अवैध मुरुमाच्या वाहतुकीबरोबरच ओव्हरलोड वाळूचीही वाहतूक दिवसरात्र सुरुच आहे. दर महिण्याला मिळणाऱ्या मलिद्यामुळे या ओव्हरलोड वाळू वाहतुकीला सुरक्षा कवच देत असल्याचे दिसून येत आहे.
त्याचबरोबर बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्यासाठी बिलोलीसह रामतीर्थ व नायगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे एक पथक स्थापन केले आहे. मात्र सदरचे पथक दि. 4 रोजी सोमठाणा रोडवर वाळूच्या गाड्या अडवल्या पण कारवाई न करताच सोडून दिल्याची घटना घडली. त्यामुळे सदरचे पथक कारवाई करण्याऐवजी मांडवली करण्यास सुरुवात केली असल्याची जोरदार चर्चा होत आहे.
एकीकडे अवैध वाळू उत्खननाच्या ठिकाणी चार चाकी वाहन जात नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक चक्क मोटरसायकलवर जावून धडक कारवाई करत असताना दुसरीकडे रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या नाकावर टिच्चून अवैध व ओव्हरलोड वाळूची वाहतूक होत आहे हे विशेष.