जोमेगाव ग्रामपंचायती मध्ये सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संगनमताने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार अनेक योजना कागदोपत्री दाखवून पैसे लाटले…

मारतळा :- लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील ग्रामपंचायती मध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी संगनमत करुन बोगस कामे दाखवत लाखोंचा भ्रष्टाचार केला असून संबंधित कामाची चौकशी करून भ्रष्ट सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांना भेटून जोमेगाव येथील शिष्टमंडळाने दि.५ मार्च रोजी निवेदन दिले आहे.
त्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की आमच्या गावात ग्राम पंचायत कार्यालय जोमेगाव ता. लोहा जि. नांदेड येथे ग्राम पंचायत अधिकारी पांडुरंग श्रीरामवार हे कार्यरत असून त्यांनी मागील अनेक वर्षांपासून गावातील विकास कामामध्ये मोठ भ्रष्टाचार केला आहे गावामध्ये विविध विकास कामामध्ये सरपंच व ईतर सदस्यांनी संगनमत करुन अनेक बोगस कामे करून लाखो रुपयांचा निधी हडप केला आहे त्यात दलित वस्ती जिल्हा परिषद अंतर्गत केलेले बोगस कामे,दलित वस्ती पंचायत समिती अंतर्गत 2017 ते 2024 पर्यंत अनेक कामे न करताच बिले उचललेली आहेत तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत विविध विकास कामे न करताच पैसे उचलून भ्रष्टाचार केलेला आहे.
ग्रामपंचायतच्या 15 व्या वित्त आयोगातुन जिल्हा परिषद शाळा व आंगणवाडी दुरुस्तीच्या नावाखाली देखील बोगस कामे करुन बिले उचलण्यात आला आहे,ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोग पाणी पुरवठा योजनेत कामे केल्याचे दाखवित काम न करताच बीले उचलून भ्रष्टाचार केलेला आहे, 90/10 या शिर्षलेखाखालीही अनेक बोगस कामे केली आहेत, रोजगार हमी योजनेतुन झाडे लावा व झाडे जगवा योजने अंतर्गत रस्त्याचा दुतर्फा झाडे लावुणे व संगोपन करणे हे फक्त कागदोपत्रीच करण्यात आले आहे.
तसेच जलजीवन योजने अंतर्गत मंजुर असलेल्या कामाचा कंत्राटदाराकडुन 15 टक्के कमीशन / हिस्सेदारी घेऊन सदरील योजनेचे काम हे अत्यंत निकृष्ट व अपुर्ण ठेवून संबंधीत ग्राम पंचायत व ग्रामविकास पंचायत अधिकारी यांनी कसल्याही प्रकारचे कामे केलेली नाहीत. घरकुल योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बाजुस ठेवुन इतर लाभार्थ्याकडुन 5 ते 10 हजार रुपये घेऊन एकाच घरात नमुना नं.8 चे उतारे वेगवेगळे दाखवून जसे की लाभार्थी स्वतः , मग मुलगा, सुन, पत्नी असे तीन तीन घरकुल एकाच घरात दिलेले आहेत.
या वरील केलेल्या बोगस कामाबाबत आम्ही ग्रामपंचायत अधिकारी यांना विचारणा करण्यास गेलो असता तुम्ही विरोधी पार्टीचे असल्याने सरपंच व ईतर लोकांना हाताशी धरुन दमदाटी करणे माझे कोणीही काहीही वाकडे करणार नाही अशी उद्दट वागणुक ते नागरिकांना देत आहेत. तसेच तुम्ही माझी तक्रार करण्यास गेलात तर उलट मी तुमच्यावर सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करेल असे बोलून धमकी देत आहे व मी तुम्हाला बघुन घेईल माझी या अगोदरची पार्श्वभुमी तपासुन घ्या व माझ्या नादी लागा अशा बोलत आहे वरील बाबीला कंटाळून आम्ही संबंधीत गट विकास अधिकारी साहेबांशी तोंडी बोलुन चर्चा केल्यानंतर त्यांचे दोन वेळा बदली आदेश काढण्यात आले.
परंतु संबंधीत ग्रामपंचायत अधिकारी गावात आल्यावर सर्व सदस्य व सरपंच यांच्या समक्ष संबंधीत बदली होऊन आलेल्या ग्राम पंचायत अधिकाऱ्यास तुम्ही आम्हास नाही पाहिजे आमचे पहिलेचे साहेबच ग्राम पंचायत अधिकारी आम्हास चांगले आहेत असे म्हणून गावातून पळवुन लावत आहेत आणि सर्वजण मिळून भ्रष्टाचारास खतपाणी घालत आहेत संबंधीत ग्राम पंचायत अधिकारी हा अत्यंत भ्रष्टाचारी व राजकिय पद्धतीचा असुन अशा एका अधिकाऱ्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहु शकत नाही तर केवळ हेकेखोर व एक हुकमी ग्राम पंचायत अधिकाऱ्यामुळे गावात प्रचंड दहशत असुन गावातील गोर गरीब जनता संबंधीत ग्राम पंचायत अधिकारी व सरपंच व सदस्य यांच्या दहशतीला असून गावातील कोणतेही व्यक्ती समोर येऊन बोलण्यास तयार नाहीत.
त्यामुळे वरील सर्व कामाची चौकशी करून संबंधित ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी निवेदनात गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.