ट्रक व मोटरसायकलच्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार ; दोघे गंभीर जखमी

मोरे मनोहर
किनाळा :- चिटमोगरा तालुका बिलोली येथील आई, मुलगा आणि नातू हे शंकरनगर येथून गावाकडे मोटर सायकलवर जात असताना नांदेड देगलूर राज्य महामार्गावर शंकरनगर पासून जवळच असलेल्या नायरा पेट्रोल पंपाजवळ झालेल्या ट्रक व मोटरसायकलच्या भीषण अपघातात आईचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा व पाच वर्षाचा चिमुकला नातु हे दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना 5 जून रोजी दुपारी सव्वातीन च्या सुमारास घडली.
सविस्तर माहिती अशी की चीटमोगरा तालुका बिलोली येथील मारुती देविदास पेंटे यांचा पाच वर्षाचा चिमुकला बालक गणेश यांना दवाखान्यात दाखवण्यासाठी म्हणून त्यांना घेऊन फुलबाई देविदास पेंटे वय वर्षे 50 आणि माधव देविदास पेंटे वय वर्षे 27 शंकरनगरला सकाळी जाऊन गणेशला दवाखान्यात दाखवल्यानंतर शंकरनगर येथून परत आपल्या मोटरसायकल वरून गावाकडे जाण्यासाठी निघाले असता.
ते शंकरनगर पासून जवळच असलेल्या नायरा पेट्रोल पंपाजवळ गेले असता देगलूर कडून नांदेड कडे येणाऱ्या भरधाव वेगातील आयचेर ट्रक क्रमांक एम एच 28 बी 8091 या ट्रकने मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात मोटार सायकलवर असलेल्या फुलबाई देविदास पेंटे यांचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात माधव देविदास पेंटे आणि पाच वर्षाचा चिमुकला बालक गणेश मारुती पेंटे हे गंभीर जखमी झाले.
ही घटना घडल्याचे रामतीर्थ पोलिसांना समजतात पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन फुलबाई देविदास पेंटे यांचे नायगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर फुलबाई यांचा चिटमोगरा येथे सायंकाळी उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तर माधव देविदास पेंटे व गणेश मारुती पेंटे यांचा प्राथमिक उपचार नायगाव येथील रुग्णालयात करून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथील रुग्णालयात पाठवण्यात आले.
चिटमोगरा तालुका बिलोली येथे 5 जून रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मात्र ही दुःखद घटना घडल्याचे समजताच जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.अपघातात आईचा मृत्यू झाला तर मुलगा आणि नातू ग़ंभीर जखमी झाल्याने आईचा शोकाकुल वातावरणात सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले असून या घटनेमुळे गावभर शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी सदरील आयचेर ट्रक रामतीर्थ पोलीस ठाण्यात लावण्यात आला असून पुढील तपास सपोनी श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.