नायगाव पंचायत समितीचा अनागोंदी कारभार : रोहयोतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी गठीत केलेल्या समित्या कागदावरच

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामातील बोगसगिरी शोधण्यासाठी पंचायत समितीच्या स्तरावरून दि. २४ जानेवारी २०२५ रोजी वेगवेगळ्या चार समित्या गठीत केल्या होत्या. या समितीवर जिल्हा परिषद गटनिहाय चौकशी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आले होती. मात्र आजपर्यंत या समितीने एकही गावाला भेट दिली नाही. त्यामुळे नायगाव तालुक्यातील भ्रष्टाचाराला या समितीचा पाठींबा असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
गटविकास अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळे नायगाव तालुक्यात मनरेगाच्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या भ्रष्टाचारात पंचायत समितीचे अधिकारीही सहभागी असल्याने शेततळे, सिंचन विहीर, फुल शेती, गायगोठे मुख्यमंत्री पांदन रस्ता, शिव पांदन रस्ता व मातोश्री पांदन रस्ता, रोपवाटिका, सार्वजनिक वृक्ष लागवड अदि कामांचा अक्षरशः बोजवारा उडवण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणमताने भ्रष्टाचार होत असताना गटविकास अधिकारी एल.आर. वाजे हे फक्त बघ्याची भुमिका घेत आहेत.
नायगाव गटातील अधिकारी मनरेगाच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यावर कुठलीच कारवाई करत नसल्याने रावसाहेब पवार व गणपत रेड्डी यांनी दि. १६ जानेवारी २०२५ रोजी एक निवेदन देवून मनरेगातील सर्व प्रकारच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती चौकशी न झाल्यखस उपोषणाचाही इशारा दिला होता. त्यामुळे नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाजे यांनी दि. २४ जानेवारी२०२४ रोजी जिल्हा परिषद गटनिहाय मनरेगाच्या कामाची चौकशी करण्यासाठी दोन विस्तार अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या चार समित्या गठीत केल्या.
त्यात विस्तार अधिकारी एस.एम.निलमवार यांच्या अधिपत्याखाली दोन समित्या गठीत करण्यात आल्या त्यात कनिष्ठ अभियंता पि.एम.पाटील, गोणेवार, व्ही.बी.कदम, डि.एल.रानवळकर यांचा समावेश असून यांनी मांजरम व नरसी गटातील कामाची चौकशी करावी तर दुसरे विस्तार अधिकारी जि.आर. टोणगे यांच्या अधिपत्याखालीही दोन समित्या गठीत करण्यात आल्या असून या समितीने बरबडा व कुंटूर जिल्हा परिषद गटातील कामांची चौकशी करावी असे आदेश देण्यात आले. टोणगे यांच्या सोबत कनिष्ठ अभियंता जिरवणकर, बी.व्ही.कदम, पी.एम. सुर्यवंशी व पी.एम.पाटील यांना देण्यात आले.
सदरच्या समितीने मांजरम, नरसी, कुंटूर व बरबडा जिल्हा परिषद गटातील मनरेगाच्या सर्व प्रकारच्या कामाची चौकशी करुन मुद्दतीत चौकशी अहवाल सादर करावा असे आदेश दिले होते. तब्बल तीन महिण्याचा कालावधी होत आला मात्र आजपर्यंत या समितीने एकाही कामाची चौकशी केली तर नाहीच पण कोणत्याही गावात फिरकले देखील नाहीत.
याबाबत विस्तार अधिकारी टोणगे यांना विचारणा केली असता अशी समिती गठीत केल्याचे लवकर आठवलेच नाही नंतर मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे चौकशी करताच आली नसल्याची सारवासारव केली. एवढ्या चांगल्या योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे याचे स्वारस्य ना गटविकास अधिकांना आहे ना पंचायत समितीच्या विस्तार अधिकांना. त्यामुळे दोन महिण्यापुर्वी गठीत केलेली चौकशी समिती कागदावरच राहीली आहे.