घरकुलाचे बांधकाम न करणाऱ्यांनाही बिले दिली ; पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्याचा प्रताप

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मिळाले पण बांधकाम न करताच बिले उचलून घेण्याची व देण्याची मोहीम नायगाव पंचायत समितीमध्ये सुरु आहे. पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्यांनी मागच्या काही महिण्यापासून काम न करणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन दोन हप्ते जमा करुन मोकळे झाले आहेत. लाभार्थ्यांना हप्ते देताना संबधीत गावच्या सरपंचाला किंवा ग्रामसेवकालाही याची कुठलीच कल्पना देण्यात येत नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार केवळ चिरिमिरीसाठीच करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नायगाव पंचायत समितीच्या निष्क्रिय गटविकास अधिकाऱ्यामुळे सध्या रामभरोसे कारभार सुरु असून कुणाचा पायपोस कुणाला राहीला नाही. परिणामी अनागोंदी कारभाराने कळस तर गाठलाच आहे पण चांगल्या योजनेचा बट्ट्याबोळ करण्याची मोहीमच पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे अभियंता राबवत आहेत. आजच्या परिस्थिती नायगाव तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेचे पहील्या टप्यातील २८३ घरकुल अपूर्ण असताना दुसऱ्या टप्प्यात १०६७९ घरकुलांना मंजुरी मिळाली.
यापैकी केवळ ६१ घरकुलाचे कामे झाली तर १०६१८ घरांचे काम अपूर्ण आहेत. मात्र पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्यांनी अपूर्ण राहीलेली घरकुले पुर्ण करण्याऐवजी स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी घराच्या बांधकामासाठी विटही न बसवलेल्या लाभार्थ्यांना कुणाला एक तर कुणाला दोन दोन हप्ते देवून मोकळे झाले आहेत. आलेले अनुदान खिरापती वाटाव्यात तसे वाटून ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे अभियंत्यांनी बोगस बिले अदा करण्याचा नवीन पँटर्न पंचायत समितीमध्ये राबविला आहे.
तिन्ही योजनेच्या घरकुलांचे कामे पुर्ण करुन घेण्याची जबाबदारी ९ ग्रामीण गृहनिर्माण विभागाच्या अभियंत्यावर आहे. मात्र हे अभियंते बांधकाम केले नसले तरी बोगस बिले अदा करत आहेत. ज्यांनी प्रत्यक्षात घरे बांधली आहेत त्यांना मात्र बिले अदा करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप अनेक लाभार्थी करत तर आहेतच पण घरकुलाचे बिले अदा करतांना संबधीत गावच्या सरपंच किंवा ग्रामसेवकाला याचा थांगपत्ताही लागू देत नाहीत.
शासकीय योजनेचे घरकुल बांधतांना वेगवेगळ्या टप्प्यावर बिले अदा करण्याची पध्दत आहे. बिले अदा करतांना लाभार्थ्यांचे बांधकाम कुठल्या टप्प्यावर आहे याची खात्री करण्याचा नियम असून बांधकाम सुरु असलेल्या जागेवर किंवा बांधकामावर उभ असलेला फोटो घेण्यात आल्यावर बिल अदा करण्यात येते परंतु नायगाव पंचायत समितीचे कंत्राटी अभियंते सर्व नियम धाब्यावर बसवून शासकीय अनुदान घरकुलाचे बांधकाम न करणाऱ्या लाभार्थ्यांकडून चिरिमीरी घेवून बिले अदा करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
घरकुल लाभार्थ्यांना त्या त्या टप्प्यावर बिल देण्यासाठी बरिच किचकट प्रक्रिया आहे पण सर्व नियम धाब्यावर बसवून घरकुलाचे बांधकाम न करणाऱ्या लाभार्थ्यांकडून चिरिमीरी बिले अदा करण्यात आहेत.