नायगाव तालुक्यात बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुलाचे हप्ते जमा : गटविकास अधिकाऱ्याचे कानावर हात

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : घरकुलाच्या बांधकामासाठी विटही बसवली नसताना कंत्राटी अभियंत्यांनी दोन दोन हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केलेले आहेत. हा सर्व प्रकार नियमबाह्य तर आहेच पण याची कुठलीच माहिती संबधीत ग्रामपंचायतला सुध्दा देण्यात आलेली नाही. बोगसगिरी करुन लाखो रुपये हडप करण्याची मोहीम सध्या नायगाव तालुक्यात सुरु असताना गटविकास अधिकारी एल.आर.वाजे हे बघ्याची भुमिका घेत आहेत.
नायगाव पंचायत समिती मध्ये घरकुल विभागात काम करणारे कंत्राटी कर्मचारी व अन्य काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीला भ्रष्टाचाराची गटारगंगा करुन टाकले आहे. रोजगार हमी योजनेसह घरकुल योजनेतही प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. नायगाव पंचायत समितीमध्ये अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार बोकाळलेला असताना गटविकास अधिकारी कारवाई संदर्भात कुठल्याच हालचाली करत नाहीत.
विशेष म्हणजे त्यांचे कुणावरच नियंत्रण नसल्याने पंचायत समितीमध्ये अभुतपुर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रोजगार हमी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी चार समित्या गठीत करण्यात आल्या पण या चौकशी समित्यांनी आजपर्यंत एकाही कामाची चौकशी केली नाही. त्यामुळे रोजगार हमी योजनेसह घरकुल घोटाळ्यातही पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे.
बिलोली तालुक्यातील घरकुल घोटाळ्यात भ्रष्टाचार उघड झाल्याने २० लोकांच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी शासनावर दबाव आणण्यासाठी घरकुलाच्या कामावर बहिष्कार घालण्याची भुमिका घेतली आहे. असे करण्यामागे घरकुल घोटाळ्यातील भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचाच प्रयत्न दिसून येतो. बिलोली तालुक्यातील घरकुल घोटाळा उघडकीस आल्यानंतर नायगाव पंचायत समितीमधील घरकुल घोटाळ्याची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
नायगाव पंचायत समितीचे काही ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे अभियंत्यांनी लाभार्थ्यांनी घरकुल बांधले नसले तरी दुसऱ्याच्या बांधकाम केलेल्या घरासमोर उभ राहून काढलेल्या फोटोच्या आधारे बिल अदा करण्याचा सपाटा लावला आहे. लाभार्थ्यांने खरोखरच घरकुल बांधले आहे का याची कुठलीच खातरजमा करण्यात येत नाही. विशेष म्हणजे घरकुल लाभार्थ्यांना त्या त्या टप्प्यावर बिल देण्यासाठी बरीच किचकट प्रक्रिया आहे पण सर्व नियम धाब्यावर बसवून घरकुलाचे बांधकाम न करणाऱ्या लाभार्थ्यांकडून चिरिमीरी बिले अदा करण्यात येत आहेत.
नायगाव पंचायत समितीमधील कंत्राटी अभियंते करत असलेल्या या भ्रष्टाचाराची माहिती गटविकास अधिकारी वाजे यांना माहीत असताना ते यावर नियंत्रण आणण्यासाठी कुठलेच पाऊल उचलत नसल्याने या घरकुल घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.