टाकळी व येळी महाटी परिसरातील गोदापात्रात एक बोट व दोन इंजिन जप्त
नायगाव व लोहा तहसीलदारांची संयुक्त कारवाई

अंकुशकुमार देगावकर
नायगाव :- गोदावरी नदी पात्रातील वाळूची चोरी थांबवण्यासाठी नायगाव व लोहा तहसीलदारांनी दि. १९ रोजी संयुक्त कारवाई केली. यात नायगाव तालुक्यातील टाकळी येथे एक बोट व एक इंजिन तर येळी महाटी परिसरात दोन इंजिन जप्त करण्यात आले. जप्त केलेली वाळू माफीयाची यंत्रणा स्फोटकाच्या सहायाने उडवून नष्ट करणात येणार असल्याची माहिती तहसीलदार सौ.धम्मप्रिया गायकवाड यांनी दिली.

लोहा तालुक्यातील वाळू माफीयांनी त्या भागातील गोदावरी नदी पात्रातील वाळू चोरी करुन संपवून टाकली. त्यामुळे या वाळू माफीयांनी आपला मोर्चा नायगाव तालुक्याकडे वळवला असून. रात्रीच्या वेळी बरबडा भागातील गोदावरी नदी पात्रातून वाळूची अत्याधुनिक इंजिन व बोटीच्या सहाय्याने चोरी करुन दिवस उजाडण्याच्या अगोदर पुन्हा यंत्रणा लोहा तालुक्यात हलवण्यात येत होती त्यामुळे नायगाव तहसीलदारांना कारवाई करण्यात अडचणी येत होत्या.
लोहा महसूल विभाग पुर्णतः वाळू माफीयांच्या दावणीला बांधल्या गेल्यामुळे त्या भागात वाळू माफीयांना अडवणारे कुणीच नव्हते. त्यामुळे वाळू माफीयांनी गोदावरी नदीपात्रातील वाळू संपवून टाकली. यामुळे शासनाला लाखो रुपयाचा फटका बसला असला तरी अधिकाऱ्यांचे पाँकेट मात्र फुगले आहे.
लोहा तालुक्यातील वाळू माफीयांनी नायगाव तालुक्यातील बरबडा शिवारातील टाकळी येथून गोदावरी नदी पात्रातून मागच्या काही दिवसापासून वाळुची मोठ्या प्रमाणात चोरी करण्याचा गोरखधंदा सुरु केला होता. त्यातच या वाळू चोरीच्या बातम्या येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी लोहा व नायगाव तहसीलदारांनी संयुक्त कारवाई करुन वाळू माफीयावर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्यामुळे दि. १९ रोजी नायगाव तहसीलदार सौ.धम्मप्रिया गायकवाड यांचे व लोहा तहसीलदार परळीकर यांच्या संयुक्त पथके नायगाव तालुक्यातील टाकळी येथे एक मोठी बोट व एक इंजिन तर लोहा तहसीलच्या पथकाने येळी महाटी परिसरात दोन इंजिन जप्त केले आहेत.
संयुक्तपणे केलेल्या कारवाईमुळे वाळू माफीयांची लाखो रुपयांची यंत्रणा महसूल विभागाच्या हाती लागली असून. वाळू माफीयांचे कंबरडे मोडण्यासाठी वाळू उपसा करणारी जप्त केलेली यंत्रणा स्फोटकाच्या सहायाने नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी दिली आहे.