आरोग्य पतसंस्थेच्या निवडणुकीत विम्याच्या नावाखाली कपात करण्यात आलेल्या रक्कमेचा विषय गाजणार

अंकुशकुमार देगावकर
नांदेड : जिल्ह्यात सध्या आरोग्य पतसंस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असुन परिवर्तन पॅनल व सत्ताधारी पॅनल या दोन पॅनल मध्ये सरळसरळ लढत होत आहे. सत्ताधारी गटाने मागील अनेक वर्षांपासून सभासदांकडून विम्याच्या नावाने कपात करण्यात आलेल्या रकमेचा विनियोग कर्मचाऱ्यांचा विमा उतरवण्यासाठी पतसंस्थेने केला नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत विम्याच्या नावाखाली कपात करण्यात आलेल्या रक्कमेचा विषय चांगलाच गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.
मागच्या चौतीस वर्षांपासून काहीजन पतसंस्थेला खाजगी मालमत्ता समजत आहेत. त्यामुळे आरोग्य पतसंस्थेची सत्ता परिवर्तन करण्यासाठी परिवर्तन पॅनलच्या रणरागिणी सरसावल्या आहेत. पतसंस्थेचा अर्थिक अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी परिवर्तन पॅनल सभासदांना प्रत्यक्ष भेटून आपली भूमिका मांडत आहे.
मागिल अनेक वर्षांपासून सभासदांकडून विम्याच्या नावाने कपात करण्यात आलेल्या रकमेचा विनियोग कर्मचाऱ्यांचा विमा उतरवण्यासाठी पतसंस्थेने केला नसल्याची बाब उघडकीस आली आहे. सभासदांची विमा कपात रक्कम पतसंस्थेच्या खात्यावर जमा ठेवली आहे. या रकमेचा उपयोग कोण करीत आहे हे गौडबंगाल आहे.
प्रत्येक सभासदाकडून दर महिण्याला विम्याच्या नावाखाली १००० रुपये कपात करण्यात येत होते. मात्र ज्यांची ज्यांची रक्कम कपात केली त्यांचा विमा काढला किंवा नाही याची कुठलीच माहिती देण्यात येतनव्हती किंवा विमा पाॅलिसीचे बाॅंड सभासदांना पतसंस्थेने दिले नाहीत.
विमा रक्कम कपात झालेले अनेक सभासद सेवानिवृत्त झाले आहेत तर अनेक सभासद मयत झाले आहेत. त्या सभासदांना पतसंस्थेने विमा रकमेचा लाभ सभासदांना दिलेला नाही. अनेक मयत सभासदांचे वारसदार विमा रक्कमेच्या लाभापासून वंचित आहेत. सध्याच्या संचालक मंडळाला या गंभीर प्रकरणाचे सोयरसुतक सुद्धा नाही.
मयत सभासदांच्या वारसदारांना पतसंस्थेच्या संचालक मंडळाकडून व पतसंस्था कर्मचाऱ्यांकडून हिनकस वागणूक मिळत आहे. मयत सभासदांच्या वारसदारांना कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू आहे. काही मयत सभासदांच्या वारसदारांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे आरोग्य पतसंस्थेच्या विम्याचे विमान सभासदांच्या खातेरुपी धावपट्टीवर धावलेच नाही तर मयत सभासदांचे वारसदार विमा रकमेसाठी टाहो फोडत आहेत.
पण संचालक मंडळाच्या काळजाला मायेचा पाझर फुटताना दिसत नाही हे विशेष. त्यामुळे परिवर्तन पॅनलच्या रणरागिणी सरसावल्या असून सत्ताधारी गटाची पोलखोल करत आहेत परिणामी कपात करण्यात आलेल्या विमा रक्कमेचा विषय या निमित्ताने गाजतांना दिसत आहे.