गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची बेळकोणीच्या अमृतालयम फार्मर प्रोड्युसर कंपनीला विशेष भेट : शाश्वत शेती मॉडेल राबविण्यावर भर

भगवान शेवाळे

नायगाव :- बिलोली तालुक्यातील बेळकोणी गावात कार्यरत असलेल्या अमृतालयम फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या शेतकरी उत्पादक संस्थेला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी (ता.23 ) रोजी भेट देत कंपनीच्या कामकाजाचा आढावा घेतला.

दर्जेदार सोयाबीन, हरभरा व करडईचे फाउंडेशन बियाणे तयार करून शेतकऱ्यांना पेरणीपासून ते शेतमाल विक्रीपर्यंत आवश्यक सेवा पुरवणाऱ्या या कंपनीचे काम शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरू शकते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेत पाणंद रस्त्यांचा प्रश्न, शेतीसाठी पाणी व्यवस्थापन, बियाण्यांची उपलब्धता व बाजारभाव आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील समस्यांची माहिती दिल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

शाश्वत मॉडेल सर्वत्र राबविण्याचा प्रयत्न..
अमृतालयम सारखे शाश्वत शेती मॉडेल इतर गावांमध्येही राबविता येईल का, यासाठी प्रशासन शेतकऱ्यांसोबत राहून काम करेल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी या कंपनीने घेतलेले पुढाकार कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या भेटीदरम्यान बिलोलीचे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यासह बेळकोणी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपापल्या समस्या मांडत त्या सोडविण्याची मागणी केली.अमृतालयम कंपनीच्या पुढाकारामुळे स्थानिक शेतकरी सशक्त होत असून अशा उपक्रमांचे प्रमाण वाढावे यासाठी प्रशासनाने हातभार लावण्याचे संकेत या भेटीतून मिळाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker