ताज्या बातम्यादेगलुरनांदेड

नागरिकांच्या संयमाचा अंत न पाहता बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु करा

खा.रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकार्‍यांना धरले धारेवर

अंकुशकुमार देगावकर

देगलूर : अतिवृष्टीमुळे लेंडी धरणग्रस्त गावांत शेकडो लोक अडकले असून अनेक जण बेपत्ता आहेत. असंख्य जनावरे वाहून गेली आहेत. त्यांना वाचविण्यासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु करण्याची गरज असताना जिल्हा प्रशासन कोणत्या आदेशाची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल करून खा.रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी लोकांच्या संयमाचा अंत न पाहता वेगाने बचाव कार्य व पंचनामे सुरु करावेत, असे जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांना बजावले.

अतिवृष्टीमुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालेल्या मुखेड तालुक्यातील भेडेगाव, हसनाळ, रावणगाव आदींसह अनेक लेंडी प्रकल्पग्रस्त गावांचा दौरा करून खा.रवींद्र चव्हाण यांनी तेथील परिस्थितीची पाहणी केली. खा.रवींद्र चव्हाण यांना झालेल्या नुकसानीचे कथन करताना आपदग्रस्तांच्या अश्रूंचा बांध फुटला. ग्रामस्थांनी अनेकदा मागणी करूनही या गावांचे वेळेत पुनर्वसन न झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हसनाळ, भेंडेगाव, रावणगाव या गावांना पुराने अक्षरशः वेढले असून शेकडो लोक कित्येक तासांपासून घरातच अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी खा.रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकार्‍यांसह संबंधित तहसीलदारांशी संपर्क साधून आवश्यक त्या सूचना दिल्या.

तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली आहे, अनेकांच्या जीविताचे व मालत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. पुरात वाहून गेलेले अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत, शेकडो जनावरांचा बळी गेला आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना धीर देण्याची गरज आहे. मदत व बचाव कार्य तसेच पंचनामे करण्यासाठी कुठल्याही आदेशाची वाट न पाहता आणि कुठल्याही कागदपत्रांची अट न ठेवता मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य द्यावे, असे आवाहन खा.रवींद्र चव्हाण यांनी केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर व पुरग्रस्त भागातील ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker