सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या…

बालासाहेब शिंदे
मारतळा :- लोहा तालुक्यातील नांदगाव येथील शेतकरी राजीव नारायण भरकडे यांनी सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून मोठ्या नाल्यात उडी घेऊन आत्महत्या केली.
राज्यभर अतिवृष्टी सदृश्य झालेल्या पावसाने शेतकरी मेटाकुटीला आला असून पाण्यामुळे पिकांचे पूर्णता नुकसान झाले आहे. झालेल्या शेतीच्या नुकसानीमुळे तसेच बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून नांदगाव ता. लोहा येथील आल्पभुधारक शेतकरी राजीव नारायण भरकडे वय वर्ष (40) या शेतकऱ्यांनी दिनांक 04 ऑक्टोबर रोजी मारतळा – नांदगाव रस्त्यालगत असलेल्या मोठ्या नाल्यात उडी घेऊन आत्महत्या केली.
दिनांक 06 ऑक्टोबर रोजी प्रेत नाल्याच्या पाण्यावर तरंगताना दिसून आले सदरील घटनेची माहिती उस्माननगर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक गजानन गाडेकर, बीट जमादार गंगाधर चिंचोरे, पो.कॉ माधव पवार हे दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणीसाठी कापसी (बु) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या महागडे यांनी शवच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
दिनांक 06 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास नांदगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत राजकुमार भरकडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, दोन भाऊ असा परिवार आहे. उस्माननगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर हे पुढील तपास करीत आहे.



