ताज्या बातम्यानांदेडनायगांव

महावितरणचा भोंगळ कारभार : खंडगावच्या २० वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : तालुक्यातील खंडगाव येथे महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे एका २० वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना शनिवार, १९ जुलै रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय शंकर जेलेवाड (वय २०) हा नेहमीप्रमाणे सकाळी 9.30 च्या दरम्यान शौचालयासाठी घराबाहेर गेला होता. मागील रात्री झालेल्या पावसामुळे परिसरातील जमीन पूर्णपणे ओली होती. याच ठिकाणी जमिनीला चिकटून पडलेल्या विद्युत तारेत वीजप्रवाह सुरू होता. या धोकादायक परिस्थितीची अजयला कोणतीही कल्पना नसल्याने त्याचा पाय त्या तारेवर पडताच त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो जागीच तडफडू लागला.

आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी धावले. त्यांनी प्रसंगावधान राखत लाकडी काठीच्या सहाय्याने अजयच्या शरीराला गुंडाळलेली विद्युत तार दूर केली. त्यानंतर त्याला तातडीने नायगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव गेला का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. जमिनीवर पडलेल्या जिवंत वीजतारा वेळेत दुरुस्त न करणे, परिसर सुरक्षित न ठेवणे आणि अशा जीवघेण्या धोक्याकडे दुर्लक्ष करणे ही गंभीर निष्काळजीपणा असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधासह कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच मृताच्या कुटुंबाला तातडीने भरघोस आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी, अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker