ताज्या बातम्यानांदेडनायगांव

कोठाळा येथे खडीकरण, पांदन रस्ते, सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लाक च्या कामावर खोटे मजूर व बोगस मस्टर ; चौकशी करण्याची मागणी

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : तालुक्यातील कोठाळा येथील सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवक आणि पंचायत समितीमधील काही कर्मचाऱ्यांच्या संगणमताने रोजगार हमी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. खडीकरण, पांदन रस्ते, सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लाक च्या कामावर.खोटे मजूर व बोगस मस्टर तयार करुन लाखो रुपये हडप करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करुन संबधीतांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा व अपहारीत रक्कम दोषीकडून वसूल करण्याची मागणी माधव पांढरे यांनी जिल्हाधिकारी नांदेड व गटविकास अधिकारी नायगाव यांचेकडे केली आहे.

नायगाव तालुक्यातील कोठाळा येथील माधव तानाजी पांढरे यांनी गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात निधीचा अपहार केल्याची तक्रार वस्तुनिष्ठ पुराव्यासह जिल्हाधिकारी व गटविकास अधिकारी यांचेकडे दि.१८ नोव्हेंबर रोजी केली आहे. सदरच्या तक्रारीत कोठाळा येथील हनमंत डांगे यांचे शेत ते बेळकोणी फाटा दोन किलोमीटर खडीकरणाचे काम करण्यात आले. यात ३ लाख ७९ हजार ६८२ अकुशल कामाची रक्कम उचलण्यात आली.

प्रत्यक्षात तिथे थातूरमातूर व सुमार दर्जाचे काम करण्यात आले. कोठाळा गावठाण ते गागलेगाव फाटा येथे मातोश्री पांदन योजनेंतर्गत एक कि.मी. काम करण्यात आले या कामात २४ लाखापैकी ७ लाख ७० हजाराचे अकुशल काम करण्यात आले. ही रक्कम हडप करण्यासाठी चक्क खोटे मजूर दाखवण्यात आले.

गावात अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाकच्यख कामासाठी ९ लाख ९९ हजार रुपये मंजूर झाले होते पण या कामाचे तीनतेरा वाजवण्यात आले. त्याचबरोबर दुसऱ्या कामातही बोगस कामे करुन ९ लाख ९९ हजाराचा भ्रष्टाचार करण्यात आला. रोजगार सेवक अरविंद रामचंद्र पांढरे, सरपंच सौ. जयश्री कैलास डांगे, ग्रामसेवक मनिष पेनेवार व वसंत पुयड या सर्वांनी खोटे व बनावट देयके तयार करुन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे.

मागच्या एक वर्षात कोठाळा येथे एक कोटी पेक्षा जास्तीची कामे करण्यात आली आहेत परंतु सर्वच कामात मोठ्या प्रमाणात खोटे मजूर, बनावट दस्तऐवज बनवून शासनाची फसवणूक करण्यात आली. या सर्व भ्रष्टाचाराला नायगाव पंचायत समितीचे अभियंते, अधिकारी आणि कर्मचारीही तेवढेच जबाबदार आहेत.

कोठाळा येथे डिसेंबर २०२४ ते आजपर्यंत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी माधव पांढरे यांनी केली आहे. तक्रारीसोबत बोगस मजूर उपस्थिती पटाच्या आणि इतर अभिलेख्यांचे वस्तुनिष्ठ पुरावे जोडले आहेत.

एकाच सत्राची हजेरी…
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या मजूरांची दोन वेळा आँनलाईन पध्दतीने हजेरी नोंदवणे आवश्यक असतांना रोजगार सेवकाने फक्त सकाळच्या सत्राचीच हजेरी नोंदवून दोन्ही सत्रातील अकुशलचे देयके मजूरांच्या नावाने काढण्यात आले.

वर्क कोड क्र. १२३५७७३११३ हा असून मस्टर क्र. ५५१९ या अंतर्गत खडीकरणाचे काम होते. दि. २६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या फोटो प्रमाणे ७ पुरुष मजूर होते. मात्र बोगसगिरी करत हजेरी पटावर ६ महिला आणि ४ पुरुष दाठवले आहेत. त्या फोटोत ज्योती नारायण नरवाडे, ललिताबाई मारोती पांढरे, सुनंदाबाई मानसिंग एडके, भारतबाई मारोती डोईवाड व अर्चना परमेश्वर एडके अदि महिला नसतांनाही उपस्थिती दाखवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker