गोदावरी मनार कामगारांच्या स्मशानभूमीच्या जागेवर होत आहे सोलार कंपनीचे अतिक्रमण

मोरे मनोहर
किनाळा :- गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथे वास्तव्यास असलेल्या कामगार कुटुंबीयांच्या अंत्यविधी करण्यासाठी गेल्या पन्नास वर्षापासून असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर आत्ताचक्क सोलार कंपनीचे अतिक्रमण होत असल्याने येथील कामगार कर्मचाऱ्यांच्या समशानभूमीचा प्रश्न निर्माण होनार असल्याने येथील कामगार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या समशानभूमीच्या जागेवरील सोलर कंपनीकडून होणारे अतिक्रमण थांबवावे अशी मागणी सुज्ञ नागरिकातून केली जात आहे.
अधिक माहिती अशी की शंकरनगर तालुका बिलोली येथे माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर यांनी सामान्य जनतेच्या विकासासाठी सुरू केलेल्या गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्यात अनेक गावातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी आलेले कामगार व त्यांचे कुटुंबीय हे कित्येक वर्षापासून याच ठिकाणी वास्तव्यास असुन हा कारखाना चालू असताना या ठिकाणी बीड जिल्ह्यातून व परिसरातील ऊसतोड कामगार कारखान्याच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत खोप्या घालून आपला उदरनिर्वाह सांभाळत असताना कित्येक कामगार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयाचा मृत्यू झाल्यानंतर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांच्या खोप्या घालून असलेल्या मोकळ्या जागेतच अनेकांचे अंत्यविधी करण्यात आले.
गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याच्या भूमिपूजनापासून ते आजपर्यंत गेली सुमारे 50 वर्षापासून येथेच वास्तव्यास असल्याने गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांची व या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कार्य करण्यासाठी आलेले बाहेर गावच्या नागरिकांसाठी हिच स्मशानभूमी म्हणून या ठिकाणी अंत्यविधी करत असलेल्या स्मशानभूमी जागेवर आजपर्यंत हजारो अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षापासून बंद अवस्थेत असताना देखील अनेक कर्मचारी येथेच असून भविष्यात हा गोदावरी मनावर सहकारी साखर कारखाना चालू होईल आणि पुन्हा वैभवाचे दिवस येतील या आशेवर अनेक जण याच ठिकाणी वास्तव्यास असताना या ठिकाणी कामगार कर्मचाऱ्यांची स्मशानभूमी म्हणून ओळख असलेल्या जागेवर आता चक्क ही जागा सोलार कंपनीला देण्यात आली असल्याने कामगार कर्मचाऱ्यांच्या स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ग्रामीण भागात आजही बाहेरगावच्या नागरिकांचा गावातील असलेल्या कोणाच्याही स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करू दिला जात नाही याच पद्धतीने गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना येथील कामगार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे निधन झाल्यानंतर आजपर्यंत कारखान्याच्या बाजूला असलेल्या शासकीय मोकळ्या गायरान जागेत अंत्यसंस्कार केले जात होते. कारखान्याच्या बाजूला असलेली ही शासनाची गायरान रिकामी जागा आता सोलार कंपनी ताब्यात घेत असल्याने कामगार कर्मचाऱ्यांच्या अंत्यविधीसाठी असलेली स्मशानभूमीची जागा सोडूनच सोलार कंपनीने आपले काम सुरू करावे अन्यथा कामगार कर्मचाऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही कामगार कर्मचाऱ्यांनी दिला आहे.



