राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शिवनेरी पोदार लर्न स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची सृजनशीलता उजळली

मोरे मनोहर
किनाळा :- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांच्या मनामध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शिवनेरी पोदार लर्न स्कूल बिजूर तालुका बिलोली येथे २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची सृजनशीलता उजळली असुन अनेक विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाबद्दल आवड निर्माण झाली असल्याचे दिसून आले.
पोदार लर्न स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री.नितीन आलियास उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.मीनाताई सुरेश कल्याण (माजी नगराध्यक्ष, नायगाव) आणि सौ.रेणुका सुभाष कल्याण यांची प्रमुख उपस्थिती होती या वेळी उपस्थित
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी विज्ञान शिक्षक ज्योत्स्ना मॅडम, येलमे सर, सोना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रकल्प, प्रयोग आणि आकर्षक मॉडेल्स सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांद्वारे विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगून नव तंत्रज्ञानानुसार आकर्षक मॉडेल्स तयार केलेल्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या माध्यमातून नवीन संशोधन विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
याप्रसंगी प्राचार्य नितीन आलियास यांनी विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात प्रगती करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



