भोपाळा येथील शेतकऱ्याची दोन्ही मुल झाले पोलीस उपनिरीक्षक

मोरे मनोहर
किनाळा :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला शिका संघटित व्हा हा मूल मंत्र तंतोतंत अंगीकारून शिक्षणाचा वसा घेतलेल्या भोपाळा तालुका नायगाव हे गाव आज शिक्षण व स्पर्धा परीक्षांमधील अनेकांनी मिळवलेल्या यशामुळे समाजासमोर आदर्श ठरत आहे. यामुळे गावातील एका शेतकरी कुटुंबातील दोन्ही मुलांनी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पद मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
भोपाळा गावातील शेतकरी कुटुंबातील एक भाऊ गजानन व्यंकटराव तोटेवाड हा पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असताना त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे धाकटे बंधू रवी व्यंकटराव तोटेवाड यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली आहे.एका शेतकरी कुटुंबातील दोन्ही मुलांनी PSI होण्याचा मान मिळविला हि गावासाठीअत्यंत अभिमानाची बाब आहे.
रवी तोटेवाड यांनी यापूर्वी काही नोकऱ्या सोडून स्पर्धा परीक्षैची तयारी सुरू ठेवली होती. कुटुंबात आधीपासूनच पोलीस सेवेतील अधिकारी होण्याची प्रेरणा असल्याने मोठ्या भावाप्रमाणेच पोलीस सेवेत अधिकारी होण्याचा त्यांचा निर्धार होता. त्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी अखेर PSI पद मिळवले. तोटेवाड कुटुंबातील आणखी एक भाऊ महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असल्याने या कुटुंबातील चारही भावंडे सेवाक्षेत्रात कार्यरत आहेत.
भोपाळा हे गाव शिक्षणाला महत्त्व देणारे गाव असून या गावात एकाचे पाहून एक आज यशस्वी पणे उच्च पदावर जाणारे विद्यार्थी घडत असून बाबासाहेबांनी सांगितलेला शिक्षणाचा मार्ग येथील अनेकांनी अवलंबल्याने आज घडीला या गावातील युवक विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy CEO), गटविकास अधिकारी (BDO), पोलीस उपनिरीक्षक (PSI), वरिष्ठ व कनिष्ठ प्राध्यापक, अभियंते, डॉक्टर, वकील, शिक्षक, CRPF, मिलिटरी, आरोग्य विभाग, आयकर विभाग, GST विभाग, महाराष्ट्र सुरक्षा दल, लेखा परीक्षण विभाग याबरोबरच विविध खाजगी कंपन्यांमध्येही अनेक युवक मोठ्या पदावर शिक्षणाच्या जोरावर कार्यरत आहेत.
अजूनही येथील अनेक विद्यार्थी शहरांमध्ये राहून उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून भोपाळा गावाने शिक्षण आणि कर्तृत्वाचा एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. नुकतीच रवी व्यंकटराव तोटेवाड यांची PSI पदावर निवड झाल्याने त्यांचे व त्यांच्या वडिलांचे भोपाळा येथील माजी सरपंच आनंदराव बावणे व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिले.



