कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या तक्रारीत मोरे यांचे नाव असल्याने भाजपच्या वर्तूळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे निष्ठावंत असलेले मनोज मोरे हे आ. राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजपमध्ये आले. पण कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या तक्रारीत मोरे यांचे नाव असल्याने भाजपच्या वर्तूळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मोरे हे बरबडा जिल्हा परिषद गटात उमेदवारीचे प्रबळ दावेदार ठरत असल्यानेच त्यांचा गेम करण्यात आला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मे.मोरे कन्स्ट्रक्शन, में. गार्गी डेव्हलपर्स आणि में.नुसरत कन्स्ट्रक्शन या जिल्ह्यातील दिग्गज कंत्राटदारांना देयके अदा न करण्याबाबत आ. राजेश पवार यांनी देगलूरच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेली तक्रार ही राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून चर्चेच्या आग्रस्थानी आहे. नुसरत व गर्गी कंन्स्ट्रक्शन चे मोईज करखेलीकर व गोविंदराव करखेलीकर हे राजकीय विरोधक आहेत हे समजण्यासारखे आहे पण मनोज मोरे हे भाजपचेच असून आ. राजेश पवार यांच्या माध्यमातून शेकडो कोटीची कामे यापूर्वी केलेली आहेत. असे असतांनाही दिलेल्या तक्रारीत मोरे यांचे नाव का घेण्यात आले असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
वास्तविक मनोज मोरे यांना घरातूनच राजकीय वारसा मिळालेला असून मोरे कुटुंबीय हे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे निष्ठावंत म्हणून जिल्हाभरात ओळख आहे. चव्हाण यांची भेट घेवून मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मुहूर्त निश्चित केला. त्याचबरोबर बरबडा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने निवडणूक लढवण्याचीही इच्छा व्यक्त करुन आ.राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला.
जोपर्यंत मोरे हे एक कंत्राटदार म्हणून काम करत होते तोपर्यंत आ. पवार यांनी सौहार्दाचे संबध ठेवले पण मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या दोन तीन दिवसातच आ. राजेश पवार यांनी बरबडा जिल्हा परिषद गटात भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून पत्नीचे सर्वत्र बँनर लावले. आमदार पत्नीची सर्वत्र बँनरबाजी झाली तरी मनोज मोरे यांची बरबडा जिल्हा परिषद गटात जोरदार चर्चा सुरू झाली.
एकीकडे आमदार आपल्या पत्नीसाठी बरबडा गटात मैदान तयार करण्याच्या कामाला लागलेले असताना दुसरीकडे मनोज मोरे हे प्रबळ दावेदार म्हणून पुढे येवू लागले होते. त्यामुळे भाजपमधील दोन तगड्या उमेदवारातून पक्ष कोणाला उमेदवारी देते याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. त्यातच जिल्हा परिषद निवडणुकीचा विषय लांबल्याने चर्चाही थांबली परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या तक्रारीनंतर नवीनच चर्चेला तोंड फुटले आहे.
आ.राजेश पवार हे बरबडा गटातून पत्नीला उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असताना मनोज मोरे हे अडथळा ठरण्याची शक्यता असल्यानेच त्यांची तक्रार करण्यात आली नाही ना अशी दबक्या आवाजात कुजबूज सुरु झाली आहे.



