ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

​लेखा विभाग सक्षम करण्यात शिवप्रकाश चन्ना यांचे योगदान मोलाचे: मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

जयवर्धन भोसीकर

नांदेड :- “जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना यांनी आपल्या सखोल अभ्यासाने आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीने लेखा विभागाचे नेतृत्व अत्यंत सक्षमपणे केले. त्यांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळेच जिल्हा परिषदेचा प्रशासकीय कारभार सुरळीत व प्रभावी झाला,” असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी काढले.

​३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झालेले मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना यांच्या सेवापूर्तीनिमित्त जिल्हा परिषदेच्या कै. शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित भव्य निरोप समारंभात त्या बोलत होत्या.

​आपल्या अध्यक्षीय भाषणात मेघना कावली म्हणाल्या की, चन्ना साहेबांनी केवळ स्वतःचे काम चोख बजावले नाही, तर आपल्या सहकाऱ्यांकडूनही वेळेत कामे पूर्ण करून घेण्याचे कसब दाखवले. त्यांनी लेखा विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करून एक सक्षम टीम तयार केली आहे. विशेषतः विभागातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेले प्रोत्साहन आणि सन्माननीय वागणूक यामुळे त्यांची ओळख एक संवेदनशील अधिकारी म्हणून झाली आहे. भविष्यातही प्रशासकीय मार्गदर्शनासाठी चन्ना यांचा सल्ला घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

​कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते शिवप्रकाश चन्ना यांचा सपत्नीक शाल, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उमरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विश्वनाथ अडबलवार यांनाही सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. उपशिक्षणाधिकारी नीळकंठ पांचगे यांनी मानपत्राचे वाचन केले.

मान्यवरांची उपस्थिती आणि मनोगते

  • अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे: चन्ना साहेब मितभाषी असले तरी कामात अत्यंत काटेकोर होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच विविध विभागांच्या निधी खर्चाला गती मिळाली.
  • धनराज पांडे (मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मनपा): चन्ना यांनी कोषागार विभाग आणि स्थानिक लेखा परीक्षण विभागातही आपली छाप पाडली आहे.

​याप्रसंगी डॉ. संजय तुबाकले, राजकुमार मुक्कावार, डी.बी. गिरी, अमित राठोड, प्रशांत थोरात, डॉ. निलकुमार ऐतवडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जोंधळे यांनी केले, तर आभार शिवराज माटाळकर यांनी मानले.

सहकाऱ्यांच्या पाठबळामुळेच यशस्वी सेवा : शिवप्रकाश चन्ना

“१९८६ पासून सुरू झालेल्या माझ्या शासकीय सेवेत विविध विभागांत काम करण्याची संधी मिळाली. जिथे जिथे मी काम केले, तिथे सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले. त्यांच्या पाठबळामुळेच मी माझी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू शकलो,” अशा भावना शिवप्रकाश चन्ना यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker