धर्माबाद व निजामाबाद पोलिसांची मोठी कारवाई ; वर्षभरापासून फरार असलेला क्रिकेट सट्ट्यातील आरोपी जेरबंद

प्रकाश महिपाळे
धर्माबाद :– गेल्या एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा क्रिकेट सट्ट्यातील मुख्य आरोपी मनोज मानधनी याला धर्माबाद आणि निजामाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अखेर बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई अत्यंत थरारक पद्धतीने पार पडली असून, आरोपीने स्वतःला घरात कोंडून घेतल्याने पोलिसांना घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करावा लागला.
नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जिल्ह्यात गुन्हेगारांविरुद्ध ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत क्रिकेट सट्ट्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. निजामाबाद येथील क्रिकेट सट्ट्याच्या गुन्ह्यातील (गु.र.नं. ६६/२०२५) आरोपी मनोज ओमप्रकाश मानधनी (रा. बालाजी गल्ली, धर्माबाद) हा मागील एक वर्षापासून फरार होता.
तो धर्माबाद येथील त्याच्या राहत्या घरी असल्याची गोपनीय माहिती धर्माबादचे पोलीस निरीक्षक सदाशिव भडकीकर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ निजामाबाद येथील नॉर्थ रूरल सी.आय. (C.I. SIR) यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.
निजामाबाद पोलिसांचे पथक धर्माबाद येथे दाखल झाले. पोलीस घरी पोहोचले असता आरोपीने आतून दरवाजा लावून घेतला आणि तो उघडण्यास नकार दिला. जवळपास ६ तास चाललेल्या या नाट्यानंतर, पोलिसांनी अखेर घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि मनोज मानधनी याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याला पुढील कार्यवाहीसाठी निजामाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी (धर्माबाद) दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या पथकात धर्माबादचे पोलीस निरीक्षक सदाशिव भडकीकर, पोउपनि बसवंत मुख्येपोड, लोणेकर, पवार, बादेवाड, संगेवार तसेच पोलीस अंमलदार केंद्रे आणि सुपारे यांचा समावेश होता. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.



