ताज्या बातम्यानांदेडबिलोली

सहाय्यक निबंधकांच्या पत्राचा विपर्यास करून जनतेची दिशाभूल; कुंडलवाडी सोसायटीची १० एप्रिलची विशेष सभा होणारच!

चेअरमन सुनील बेजगमवार यांचा विरोधकांना टोला; ३७८ सभासदांच्या मागणीचा दिला दाखला

कुंडलवाडी : कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची आगामी १० एप्रिल रोजी होणारी विशेष सर्वसाधारण सभा ही पूर्णतः कायद्याच्या चौकटीत असून, ती नियोजित वेळेनुसार पार पडणारच आहे. काही संचालक व त्यांचे समर्थक सहाय्यक निबंधकांच्या पत्राचा चुकीचा अर्थ लावून सोशल मीडियाद्वारे जनतेची दिशाभूल करत असल्याचा खळबळजनक आरोप संस्थेचे चेअरमन सुनील बेजगमवार यांनी केला आहे.

कुंडलवाडी सोसायटीच्या ३७८ सभासदांनी लेखी मागणी केल्यानुसार, दि. १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजता संस्थेच्या प्रांगणात विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही संचालकांकडून सहाय्यक निबंधकांचे एक पत्र व्हॉट्सॲपवर व्हायरल केले जात असून, ही सभा होणार नसल्याचा संभ्रम निर्माण केला जात आहे.

​या संदर्भात स्पष्टीकरण देताना चेअरमन बेजगमवार म्हणाले की, “वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी आहे. सहाय्यक निबंधकांनीच जा.क्र. २५१/२६, दि. ०१/०४/२०२६ च्या पत्राद्वारे संस्थेला विहित मुदतीत उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. याच निर्देशांचे पालन करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७६ (१) अन्वये ही विशेष सभा बोलावण्यात आली आहे.”

बेजगमवार यांनी पुढे कायदेशीर मुद्द्यावर बोट ठेवताना सांगितले की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाच्या कलम ७३-ख (अ) नुसार, थकबाकीदार असलेले संचालक बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव घेण्यास कायद्याने अपात्र ठरतात. अशा स्थितीत संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला जाणारा कोणताही ठराव अवैध ठरेल. त्यामुळे सभासदांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी विशेष सभा घेणे अनिवार्य आहे.

३७८ सभासदांनी अधिकृतरीत्या मागणी केलेली असताना ही सभा रोखणे म्हणजे सभासदांच्या लोकशाही अधिकाराची गळचेपी करण्यासारखे आहे. विरोधकांनी कितीही दिशाभूल केली, तरी ही सभा १० एप्रिल रोजी कोणत्याही परिस्थितीत होणारच, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​या जाहीर खुलाशामुळे कुंडलवाडी येथील राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून, आता १० एप्रिलच्या सभे कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker