भर दुपारी बसमध्येच पाच लाखांचे दागिने लंपास

New Bharat Times नेटवर्क
उदगीर : मंगळवारी भरदुपारीच लातूरहून उदगीरकडे येत असताना बसमध्येच अज्ञात चोरट्याने ज्येष्ठ शेतकऱ्याच्या बॅगेतील सुमारे चार लाख 87 हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विलास विराप्पा उमाटे (वय 68), रा. वलांडी ता. देवणी, जि. लातूर हे आपल्या पत्नीसह मंगळवारी दि. 14 रोजी दुपार 1 ते 2.30 दरम्यान लातूरहून उदगीरकडे बसने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान बावलगाव पाटी (ता. चाकूर) परिसरात अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील बॅगेत ठेवलेले मौल्यवान दागिने लंपास केले.
चोरी गेलेल्या मालामध्ये दोन पोहे हार (12 तोळे), मिनी गंठण, लॉकेट, नेकलेस, अंगठ्या, झुमके, मंगळसूत्र, पाटल्या तसेच चांदीचे वाळे असा एकूण 4 लाख 87 हजार रुपयांचा ऐवज असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमुद केले आहे. पोलीस निरीक्षक अशोक आनंत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.
बसमधील प्रवाशांची चौकशी तसेच परिसरातील माहितीच्या आधारे चोरट्याचा माग काढण्याचे प्रयत्न पोलीसांकडून सुरू आहेत.या घटनेची नोंद रात्री 11.27 वाजता ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे हे करीत आहेत.



