ताज्या बातम्यानांदेडनायगांव

डोंगरगावात आग: जलजीवनचे पाईप आणि कडब्याचे ढीग जळून खाक; नगरपंचायतीच्या दिरंगाईमुळे संताप

गाडीत डिझेल नाही, पाणी भरायचंय... नगरपंचायतीची उडवाउडवीची उत्तरे

प्रकाश महिपाळे


​नायगाव :- नायगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे आज दुपारी अचानक लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत कडब्याचे दोन ढिगारे, जलजीवन मिशनचे सुमारे २० ते ३० पाईप आणि जुन्या घराचे साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
​मिळालेल्या माहितीनुसार, गावातील माजी पोलीस पाटील हनुमंतराव पाटील यांचे घर या आगीच्या ठिकाणापासून अगदी जवळ होते. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि प्रयत्नांमुळे हे घर थोडक्यात बचावले. आग लागल्याचे समजताच नागरिकांनी तातडीने तहसीलदार प्रिया गायकवाड यांच्याशी संपर्क साधला.

तहसीलदारांनी घटनेचे गांभीर्य ओळखून नायगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी (सीओ) गांधाली पवार यांना अग्निशामक दलाची गाडी तात्काळ डोंगरगावला पाठवण्याच्या सूचना दिल्या. मात्र, नगरपंचायत प्रशासनाकडून घटनेची तत्परता दिसून आली नाही. “गाडीत डिझेल नाही” किंवा “पाणी भरायचे आहे” अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन गाडी पाठवण्यास विलंब केला गेला.

नगरपंचायतीच्या या दिरंगाईमुळे आग विझवण्यास उशीर झाला. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे आणि निष्काळजीपणामुळे डोंगरगावच्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा प्रशासनावर कारवाई होणार का?” असा सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत. वृत्त लिहेपर्यंत अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली नव्हती.

तहसीलदार सूचना देऊनही प्रशासन एवढं गाफील का? उन्हाळ्याची पूर्वतयारी कागदावरच आहे का? लोकांच्या मालमत्तेची आणि जीवांची किंमत प्रशासनासाठी काहीच नाही का? प्रशासनाचा हा आडमुठेपणा आणि निष्काळजीपणा आता जनतेच्या जीवावर उठत आहे. हेच का तुमचे आपत्ती व्यवस्थापन?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker