कष्टकरी संघटनेचे नायगाव येथे 25 वे अधिवेशन संपन्न

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : शहरातील महात्मा फुले कॉलनीतील डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात कष्टकरी संघटनेचे 25 वे अधिवेशन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी वर्गाच्या विविध समस्यांसाठी कार्यरत असलेल्या या संघटनेच्या अधिवेशनास मोठ्या संख्येने महिला-पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. अरविंद देशपांडे होते, तर उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. के. हरिबाबू उपस्थित होते. प्रारंभी कष्टकरी जनतेच्या समस्या व व्यथा मांडण्यात आल्या. प्रस्तावनेत कॉ. देवराव आईलवार यांनी मागील कामाचा आढावा घेत पुढील दिशा स्पष्ट केली.
प्रमुख प्रवक्ते कॉ. रविंद्र जोशी यांनी कामगार व शेतकरी यांची एकजूट काळाची गरज असल्याचे सविस्तरपणे मांडले. अध्यक्षीय भाषणात कॉ. अरविंद देशपांडे यांनी देश व जागतिक पातळीवर कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्या विरोधात सरकारने काढलेल्या काळ्या कायद्यांवर व शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांवर भाष्य केले.
दुसऱ्या सत्राचे अध्यक्षस्थानी प्रसिद्ध शाहीर दिगू तुमवाड होते. सहमित्र संघटनेचे कॉ. दिगांबर घायाळे यांनी संघटनेतर्फे संदेश दिला. कॉ. चंद्रकांत गायकवाड देगावकर यांनी क्रांतिकारी गीत सादर केले. अहिल्याबाई शेळके व रुक्मिणीबाई डुमणे यांनीही गीते सादर केली.
ज्येष्ठ पत्रकार माधव बैलकवाड यांनी कामगार व शेतकरी एकजुटीची गरज विषद केली. यावेळी कॉ. देवराव आईलवार यांनी नवीन कमिटीची निवड जाहीर केली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माधव पवार यांनी केले. शाहीर दिगू तुमवाड यांनी रचलेल्या “कष्टकरी जनता भूषण भारता, वंदन करितो पददलिता” या गीताने अधिवेशनाची सांगता झाली.
यावेळी प्राध्यापक हनमंत हांडे, नागोराव वाघमारे, पत्रकार प्रल्हाद भालेराव, मारुती कांबळे, बाबू देवाने, धोंडीबा कांबळे, धोंडीबा वाघमारे यांच्यासह बहुसंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.



