कुंटूर जिल्हा परिषद हायस्कूलचे दहावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश ; अजिंक्य सोनकांबळे ९३.२० टक्क्यांसह प्रथम

प्रकाश महिपाळे
नायगाव : नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात कुंटूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलने आपले वर्चस्व कायम राखत ७५.४२ टक्के निकालासह घवघवीत यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शाळेतून एकूण १७५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात २२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, २७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी, तर ४५ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी प्राप्त केली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांची यादी: प्रथम: अजिंक्य प्रशांत सोनकांबळे (९३.२०%)द्वितीय: वैष्णवी गजानन संगेवार (९०.४०%)तृतीय: अनिकेत हनमंत कदम (८८.४०%) विद्यार्थ्यांनी केवळ एकूण टक्केवारीतच नव्हे, तर वैयक्तिक विषयांतही उत्तम कामगिरी केली आहे.
यामध्ये कु.श्रावणी विलास लव्हाळे हिने मराठी विषयात सर्वाधिक ९४ गुण मिळवले. प्रथम आलेल्या अजिंक्य सोनकांबळे याने हिंदीत ९७ आणि इंग्रजीत ८९ गुण मिळवून आपली चमक दाखवली. अनिकेत कदम याने गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयांत ९८-९८ गुण मिळवत गणितावर आपली पकड सिद्ध केली. तसेच सामाजिक शास्त्र विषयात विद्या सुनील महागावे ८९ गुणांसह अव्वल ठरली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बोलताना मुख्याध्यापकांनी सांगितले की, “शिक्षक वृंदाचे योग्य मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेला सातत्यपूर्ण अभ्यास यामुळेच हे यश शक्य झाले आहे.” या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.



