ताज्या बातम्यानांदेडबिलोली

विद्यार्थ्यांचे कागदपत्रे तात्काळ द्या- नगरसेविका अनुपमा गायकवाड यांची मागणी

बिलोली :- दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र तसेच इतर शासकीय कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी नगर परिषद बिलोलीच्या नगरसेविका सौ. अनुपमा महेंद्र गायकवाड यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाविद्यालयीन प्रवेश, शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा व विविध शैक्षणिक प्रक्रियांसाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची तातडीची आवश्यकता भासत आहे. मात्र तहसील कार्यालयात दाखल्यांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून विद्यार्थी व पालकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

तसेच ऑनलाइन प्रक्रियेमधील तांत्रिक अडचणी, विलंब व अपुरी कर्मचारी व्यवस्था यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असल्याने आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या अर्जांना प्राधान्य देऊन तात्काळ मंजुरी द्यावी, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करावा, अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावेत तसेच शैक्षणिक प्रवेशाची अंतिम मुदत लक्षात घेऊन विशेष दाखला वितरण मोहीम राबवावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी सौ. अनुपमा महेंद्र गायकवाड यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker