रानसुगावात पहाटेच लागली आग ; गावकऱ्यांच्या हुशारीने वाचला ट्रॅक्टर, मोठा अनर्थ टळला!

नायगाव:- नायगाव तालुक्यातील मौजे रानसुगाव येथे सोमवार, दि. १८ मे रोजी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. येथील शेतकरी सुभाष गंगाराम जाधव यांच्या आकड्याला पहाटे ४ वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये हजारो रुपयांचा कडबा, जनावरांचा चारा आणि शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार शेतकऱ्याचे सुमारे लाख ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना ग्रामीण भागात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. रानसुगाव येथील गट क्रमांक २७२ मधील शेतकरी सुभाष जाधव यांच्या आकड्यात अचानक आग लागल्याचे सर्वात आधी शेजारील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ आरडाओरडा करत गावकऱ्यांना याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आग अधिक पसरण्याआधीच आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, आगीची तीव्रता इतकी भीषण होती की आकड्यातील संपूर्ण चारा व साहित्य जळून खाक झाले. या आगीची झळ बाजूलाच उभ्या असलेल्या एका ट्रॅक्टरलाही बसली होती; परंतु ग्रामस्थांनी योग्य वेळी आणि तातडीने केलेल्या प्रयत्नांमुळे ट्रॅक्टर सुरक्षित बाजूला काढण्यात यश आले, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला.
या घटनेबाबत नुकसानग्रस्त शेतकरी सुभाष जाधव यांनी संशय व्यक्त केला आहे. ही आग नैसर्गिक नसून, कोणीतरी जाणीवपूर्वक लावली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलीस व संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली असून, प्रशासनाने याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.
या अचानक लागलेल्या आगीमुळे रानसुगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महसूल प्रशासनाने तात्काळ घटनेचा पंचनामा करावा आणि आर्थिक संकटात सापडलेल्या पीडित शेतकऱ्याला तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.



