नायगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी सतीश लोकमनवार, गणेश नायगावकर बिनविरोध

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : नगरपंचायतीच्या दोन स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया शुक्रवार, दि. 22 रोजी खेळीमेळीत पार पडली. पीठासन अधिकारी तथा बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत व्यापारी सतीश लोकमनवार व गणेश नायगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर शहरात फटाके फोडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकृत सदस्य निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करून पीठासन अधिकारी म्हणून सौ. डोंबे यांची नियुक्ती केली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी 11 वाजता नगरपंचायत सभागृहात नगरसेवकांची विशेष बैठक झाली. दोन सदस्यपदासाठी फक्त लोकमनवार व नायगावकर यांचेच अर्ज आल्याने सौ. डोंबे यांनी दोघेही बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले.
मुख्याधिकारी गंधाली पवार यांनी सहायक म्हणून काम पाहिले. नगराध्यक्षा अर्चना चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, गटनेते सुधाकर शिंदे, नगरसेवक शिवाजी कल्याण, मिनाताई कल्याण, गिता जाधव, आशाताई बोईनवाड, शरद भालेराव, सुमनबाई सोनकांबळे, सय्यद सरवरी, विजय भालेराव, दयानंद भालेराव, ललिता भालेराव, विठ्ठल बेळगे, काशीबाई मद्देवाड, शेख मरीयमबी यांच्यासह कर्मचारी गजानन कदम, रामेश्वर बापूले उपस्थित होते.
नायगाव नगरपंचायत काँग्रेसचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या ताब्यात असून नगरपंचायतचा कारभार विजय चव्हाण पाहतात. सर्व 17 नगरसेवक काँग्रेसचे असल्याने निवड प्रक्रिया एकमताने व उत्साहात पार पडली.



