ताज्या बातम्यानांदेडनायगांव

पेरणीच्या तोंडावर डिझेल, गॅस टंचाई ; नायगावात शेतकरी भूमिपुत्र आक्रमक, तहसीलदारांना निवेदन

प्रकाश महिपाळे

नायगाव :- सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे वेगाने सुरू असून पेरणी तोंडावर आली आहे. अशा ऐन गर्दीच्या वेळीच तालुक्यात डिझेल, पेट्रोल आणि घरगुती गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या इंधन टंचाईमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले असून, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज विविध संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. इंधनाचा पुरवठा त्वरित सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पाण्याचे पंप, फवारणी यंत्रे तसेच शेतीची विविध आधुनिक अवजारे चालवण्यासाठी डिझेलची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र, तालुक्यात इंधन मिळवण्यासाठी वाहनधारकांच्या आणि शेतकऱ्यांच्या किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा अमूल्य वेळ आणि पैसा तर वाया जात आहेच, शिवाय शेतीची कामेही खोळंबली आहेत. दुसरीकडे, घरगुती गॅस सिलिंडर मिळण्यातही मोठ्या अडचणी निर्माण झाल्याने गृहिणी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत.

आधीच बियाणे, खते आणि शेतीचा एकूण खर्च भरमसाठ वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यातच आता ऐन पेरणीच्या तोंडावर निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे ‘शेतकरी भूमिपुत्रां’च्या अडचणीत आणखी भर पडली आहे. प्रशासनाने या परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन डिझेल, पेट्रोल व गॅसचा पुरवठा नियमित व सुरळीत करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

“शेतकरी रात्रंदिवस शेतात मेहनत करत आहे. अशा वेळी इंधन टंचाईमुळे त्याचा छळ थांबला पाहिजे. प्रशासनाने तात्काळ पुरवठा सुरळीत केला नाही, तर प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

हिंद युवा परिषद, राष्ट्रीय मराठा महासंघ, अखिल भारतीय छावा संघटना व नायगाव तालुक्यातील शेतकरी भूमिपुत्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी हणमंत पाटील शिंदे, श्यामसुंदर पाटील शिंदे, चंद्रकांत पाटील पवार, रणजित देसाई, छावा संघटनेचे साई पाटील मोरे यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker