कोलंबी जलउपसा सिंचन प्रकल्पातील निकृष्ट कामांवर शेतकऱ्यांचा संताप ; १ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

प्रभाकर लखपत्रेवार
नामगाव : कोलंबी जलउपसा सिंचन प्रकल्पातील निकृष्ट व अपुऱ्या कामांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून, संबंधित कामे तात्काळ पूर्ण न झाल्यास येत्या १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पावर करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या कथित निष्काळजीपणामुळे, कंत्राटदारांच्या बोगस कारभारामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प अद्याप अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण करू शकलेला नाही, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच अनेक अनियमितता झाल्या आहेत. कालवे व यंत्रणांची अनेक कामे अपूर्ण अवस्थेत असून, अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याची तक्रार आहे. परिणामी शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असतानाही जनावरांनादेखील पाणी उपलब्ध होत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, बळेगाव ते घुंगराळा दरम्यान टाकण्यात आलेल्या पाइपलाइनचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रायझिंग मेल कंपनीचे पाईप वापरण्यात आलेले सातत्याने फुटत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचून नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने केलेले काम बोगस असून वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर आज निवासी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला.
हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास गंगनबीड, रानसुगाव, तागबीड, पळसगाव, लालवंडी, हिप्परगा, अंचोली, कोलंबी व मांजरमसह सुमारे २५ गावांचा शिवार सिंचनाखाली येऊन हा भाग सुजलाम-सुफलाम होऊ शकतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
यावेळी कांतराव निकपुरे, कैलास जाधव, संतोष जाधव, शिवानंद जाधव, गोविंद संग्रपवार, रणजीत जंगले, तिरुपती जाधव, प्रकाश जाधव, वसंत जाधव, शंकर जाधव, विठ्ठल जाधव, शिवहार जाधव, बालाजी जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.



