कुंडलवाडीत खाजगी ले-आउट मध्ये शहरासाठी आलेल्या विकास निधीचा गैरवापर
◆ दोषींवर कारवाई करण्याची माजी उपनगराध्यक्ष डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार यांची मागणी

कुंडलवाडी :- शहरात प्रशासक राजवटीत भाजप कार्यकर्त्यांच्या खाजगी ले-आउट मध्ये विकास निधींचा मोठा गैरवापर झाला असून याबाबत चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याबरोबरच विकास निधीची वसुलीही करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार यांनी दि.२२ फेब्रुवारी रोजी शहरातील कै.गोपीनाथराव मुंडे चौक येथे पत्रकार परिषदेत केली आहे.
कुंडलवाडी नगर परिषदेची निवडणूक पार पडण्यापूर्वी गत तीन वर्ष प्रशासक राजवट होती. या प्रशासक राजवटीत मार्च २०२५ मध्ये गट क्रमांक ३३८ -याकावार अँड उत्तरवार ले-आउट व गट क्रमांक २४९ राजेश्वर उत्तरवार ले-आउट या खाजगी ले-आउट मध्ये सी सी रोड व आरसीसी नाल्यांसाठी सुमारे २ कोटी २९ लाख ४६० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद नगरपरिषद कुंडलवाडी या नावाने दाखवण्यात आली आहे.
यापैकी अनेक कामे या खाजगी ले-आउट मध्ये सध्या सुरू आहेत. खाजगी ले-आउट मध्ये पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी ही खाजगी ले-आउट विकासकाची असताना सुद्धा गट क्र. ३३८ व गट क्र. २४९ या ठिकाणी लोक वस्ती नसतानाही सार्वजनिक निधीतून कोट्यावधीचा खर्च करणे हे महाराष्ट्र रीजनल अँड टाऊन प्लॅनिंग ऍक्ट १९६६ व युडीसीपीआर नियमांचे उल्लंघन आहे.
शहरासाठी आलेला विकास निधी खाजगी ले-आउट धारकांच्या फायद्यासाठी त्यांच्या खाजगी ले-आउट मध्ये वापर करण्यात आल्याने या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी व या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या प्रशासक, मुख्याधिकारी गट क्रमांक ३३८ -याकावार अँड उत्तरवार ले-आउट व गट क्रमांक २४९ राजेश्वर उत्तरवार ले-आउट या विकासकांवर फौजदारी कारवाई करण्याबरोबरच विकास निधीची वसुली ही करण्यात यावी अन्यथा याबाबत न्यायालयीन लढाईही आगामी काळात लढणार असल्याचे असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.
पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गंगाधर मरकंटे, नगरसेविका प्रतिनिधी विलास मोमयावार, माजी नगरसेवक बाशिद शेख यांच्यासह शहरातील पत्रकार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



