दीड कोटी खर्चून केलेल्या सिमेंट रस्त्याला दिड वर्षातच भेगा , कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताचा आरोप

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : तालुक्यातील डोंगरगाव फाटा ते हुस्सा या राज्य मार्ग 251 च्या सुधारणेसाठी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या दीड कोटी रुपयांच्या निधीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. संबंधित कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या दीड वर्षातच नव्या सिमेंट रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या असून रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
नायगाव तालुक्यातील डोंगरगाव फाटा ते हुस्सा या राज्य रस्ता क्रमांक २५१ च्या सुधारणा कामासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून मागील वर्षी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, संबंधित कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्याने अवघ्या एक ते दीड वर्षातच नव्या सिमेंट रस्त्यावर मोठ-मोठ्या भेगा पडल्या आहेत. अधिक गंभीर बाब म्हणजे, कंत्राटदाराने अंदाजपत्रकानुसार काम न केल्याचे स्पष्ट दिसत असतानाही जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग नायगावच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच पावसाळ्यात पाणी तुंबणे, सिमेंटची थर उखडणे आणि रस्त्यावर दीर्घ भेगा पडण्यास सुरुवात झाली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कंत्राटदाराने दर्जेदार सिमेंट, योग्य प्रमाणात आणि आवश्यक जाडीचा थर वापरलेला दिसत नाही. त्यामुळे रस्ता लवकरच खराब झाला आहे.स्थानिक ग्रामस्थ आणि नियमित प्रवासी म्हणतात, “हा रस्ता डोंगरगाव, हुस्सा व परिसरातील शेकडो शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे.
दीड कोटी रुपये खर्च करूनही रस्ता इतक्या लवकर खराब होणे ही जनतेची फसवणूक आहे.” जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने कामाचे निरीक्षण करून प्रमाणपत्र दिले की नाही, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. कंत्राटदाराने अंदाजपत्रकातील निकष पाळले नसताना विभागीय अधिकाऱ्यांनी का दुर्लक्ष केले, याची चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
या प्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी आणि बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक स्तरावर होत आहे. निकृष्ट रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने याबाबत तातडीने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



