ताज्या बातम्यानांदेडनायगांव

कासराळीच्या जिल्हा बँकेत 3 लाखाचा अपहार : दिवंगत आमदाराच्या खात्यातूनही 40 हजार हडपले

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिलोली तालुक्यातील कासराळी शाखेत धक्कादायक अपहार समोर आला आहे. दिवंगत माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांच्या खात्यातून परस्पर 40 हजार रुपये व इतर 7 खातेदारांचे मिळून 3 लाख 22 हजार 100 रुपये शाखाधिकारी व कॅशियरने संगनमताने स्वतःच्या खात्यावर वर्ग केल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले. याप्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कासराळी ता. बिलोली येथील जिल्हा बँकेच्या शाखेत नियमित ऑडिट सुरू असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना खात्यांमधील व्यवहारात मोठी तफावत व संशयास्पद नोंदी आढळल्या. 9 जून रोजी एका तक्रारदाराने तक्रार नोंदवल्यानंतर सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत शाखाधिकारी डी. डी. देशमुख व कॅशियर पी. बी. इबीतदार यांनी संगनमत करून बँकेच्या सभासदांची रक्कम परस्पर नायगाव येथील स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर वर्ग केल्याचे स्पष्ट झाले. यात गोविंद कुलकर्णी, हरिदास नामघटी, इरबा डुबुकवाड, पुंडलिक तर्काटे, रुक्मीनबाई मुके, अहमद पिंजारी, कोंडीबा सायलु यांच्यासह दिवंगत माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांच्या खात्यातून 40 हजार रुपये परस्पर वळते केल्याचे निष्पन्न झाले.

गुन्हा दाखल, आरोपी फरार…
प्रकार गंभीर असल्याने बँकेचे विद्यमान शाखा प्रमुख राजेश मारोती पाटील, रा. लघुळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी, दि. 23 रोजी बिलोली पोलीस ठाण्यात शाखाधिकारी देशमुख व कॅशियर इबीतदार यांच्याविरुद्ध अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस तपास करत आहेत.

सेवानिवृत्ती आधीच कारवाई…
विशेष म्हणजे आरोपी शाखाधिकारी डी. डी. देशमुख हे 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यापूर्वीच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण…
नांदेड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाकडून खातेदारांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच दिवंगत आमदाराच्या खात्यातील रक्कम लाटल्याने सामान्य खातेदारांमध्ये धडकी भरली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असताना हा अपहार समोर आल्याने बँकेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker