विहिरीवरील स्टार्टर सुरू करताना विजेचा शॉक; कुंटूर तांड्यात ४८ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : कुंटूर तांडा (ता. नायगाव) येथे विजेचा तीव्र धक्का लागून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. कमलाकर गोविंद पवार (वय ४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते कुंटूर येथील सेवा सहकारी सोसायटीचे संचालक होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुंटूर व कुंटूर तांडा परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण व इतर कार्यक्रम आटोपल्यानंतर कमलाकर पवार हे नेहमीप्रमाणे शेताकडे गेले होते. सायंकाळच्या सुमारास शेताजवळील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीवरील स्टार्टर सुरू करण्यासाठी ते गेले असता हा दुर्दैवी प्रकार घडला. मागील काही दिवसांपासून परिसरात पावसामुळे ओलावा निर्माण झाला होता. त्यातच स्टार्टरमध्ये लूज कनेक्शन असल्याने अचानक विजेचा जोरदार प्रवाह त्यांच्या शरीरातून गेला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मोबाईलच्या रिंगमुळे उघडकीस आली घटना कमलाकर पवार हे बराच वेळ होऊनही घरी परतले नसल्याने त्यांच्या मुलाने शेताकडे जाऊन शोध घेतला. यावेळी विहिरीच्या दिशेने मोबाईलची रिंग ऐकू आली. त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता कमलाकर पवार हे निपचित अवस्थेत आढळून आले. त्यानंतर मुलाने आरडाओरडा करून ग्रामस्थांना व पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच कुंटूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. सपोनि विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार मोहन कंधारे पुढील तपास करीत आहेत.
सामाजिक कार्यात होते अग्रेसर कमलाकर पवार हे मनमिळाऊ स्वभावाचे आणि सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनामुळे मित्रपरिवार, नातेवाईक व ग्रामस्थांमधून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, दोन भाऊ व भावजय असा परिवार आहे.



