लोहा तालुक्यातील रोहयो भ्रष्टाचाराचे प्रकरण पोहचले विधानसभेत : आ.तिडके यांचा ‘तारांकित’ प्रश्न

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : लोहा पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या 458 कामावरील 5154 मजूर कागदावर दाखवून कामे जेसीबीने करण्यात आली व बोगस मस्टर भरण्यात आल्याचे प्रकरण विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नांदेड दक्षिणचे आमदार आनंद तिडके यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे विधानमंडळ सचिवालयाने याबाबत तत्काळ माहिती सादर करण्याचे आदेश दिल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दि. 3 मार्च पासून सुरु झाले आहे. या अधिवेशनात आमदारांना संबधीत मंत्र्याकडून तोंडी उत्तर मिळण्यासाठी ‘तारांकित’ प्रश्न मांडता येतात. त्यामुळे नांदेड दक्षिणचे आमदार आनंद तिडके यांनी दि. 3 मार्च रोजी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात झालेल्या रोजगार हमी योजनेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत तारांकित प्रश्न (5174) उपस्थित केला असून.
(१) नांदेड जिल्ह्यातील लोहा पंचायत समिती अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत बहुतांश गावात ४५८ कामांवर तर ५१४५ रोजगार कागदावर दाखवून मशीनद्वारे काम सुरु असून बोगस हजेरीपट भरुन गैरव्यवहार केल्याचे माहे जानेवारी, २०२५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे. हे खरे आहे काय. (२) असल्यास, उक्त प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करुन सदर समितीने चौकशी पूर्ण करुन आपला अहवाल शासनास सादर केला आहे काय?
(३) याप्रकरणी शासनाने चौकशी करुन समितीच्या अहवालानुसार संबंधीत दोषींविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे. असा प्रश्न उपस्थित केला आहे आणि या प्रकरणी सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय अशी विचारणा केली.
शिंदे सेनेचे आ.आनंद तिडके यांचा तारांकित प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात आल्याने विधानमंडळ सचिवालयाने याबाबत विभागीय आयुक्त औरंगाबाद, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त नागपूर आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम सयन्वयक यांनी प्रश निहाय आणि मुद्द्याची माहिती तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या तारांकित प्रश्नामुळे जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. आ.तिडके यांनी मांडलेला प्रश्न स्विकृत झाल्यास त्यावर दि. 20 मार्च रोजी रोहयो मंत्री उत्तर देण्याची शक्यता आहे.