पोषण आहार सेविकेसोबत शिक्षकाचे लज्जास्पद कृत्य : बरबडा वाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : जिल्हा परिषद शाळा ही ज्ञानाची व सुरक्षिततेची जागा मानली जाते. मात्र नायगाव तालुक्यातील बरबडा वाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार सेविकेचा छळ झाल्याची गंभीर घटना समोर आली असून, यानिमित्ताने शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
नायगाव तालुक्यातील बरबडावाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना खाऊ शिजवणाऱ्या महिलेसोबत गैरवर्तन केल्याची घटना दि. 4 फेब्रुवारी घडली होती. आता त्या महिलेने संबंधित शिक्षकाविरुद्ध कुंटूर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, याप्रकरणी रविवार दि. 8 रोजी गुन्हा क्रमांक २२/२०२६ भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ७४, ७५ ( २) ११५ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, शालेय पोषण आहाराचे धान्य नीटनेटके करण्याचे कारण सांगून शिक्षकाने पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेला शाळेत बोलावून घेतले. संबंधित महिला शाळेच्या वरंडयात धान्य नीट करीत असताना त्या शिक्षकाने आपल्या खिशातील शंभर रुपयांचे बंडल काढून त्या महिलेला दाखवून वर्गात ये म्हणत शरीर सुखाची मागणी केली. वाईट उद्देशाने हात धरून शरीराशी अश्लील चाळे करत लज्जा वाटेल असे कृत्य करत विनयभंग केला.
संबंधित महिलेने विरोध केला असता तिला थापड बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर फिर्यादी गंगूबाई तेलंग यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली असून, जिल्हा परिषद शाळा वाडी येथील सहशिक्षक संजय मानकरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संबंधित शिक्षकाचे अनेक कारनामे यानिमित्ताने पुढे येत असून, शिक्षणाधिकाऱ्यांना सुद्धा या शिक्षकाने जुमानले नसल्याची जोरदार चर्चा होत आहे.
दरम्यान नायगाव तालुक्यात अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त असूनही शिक्षक अपुरे आहेत. मात्र बरबडावाडी येथील जिल्हा परिषद शाळेत केवळ चार विद्यार्थी असताना दोन शिक्षक कार्यरत आहेत, शिक्षण विभागाचे हे सूत्र कशाच्या आधारावर आहे हे कळायला मार्ग नाही.



