सरपंचाच्या तक्रारीनंतर लाँजमधील वेश्या व्यवसाय आला चव्हाट्यावर : जनता करु लागली छी…. थू…

◆ अंकुशकूमार देगावकर ◆
नायगाव : नरसी येथील सरपंचाने दिलेल्या तक्रारीमुळे वेश्या व्यवसायाबाबत बोंबाबोंब उठली असली तरी नरसी येथील सर्वच लाँज ह्या धनदांडग्यांच्याच आहेत. मात्र ते केवळ पैशाच्या हव्यासापोटी चमडी बेच के दमडी कमवण्याचा गोरखधंदा सुरु केल्याने जनतेतून अक्षरशः छी… थू…. होत आहे.
नरसी येथे पाच ते सहा लाँजींग आहेत पण हे लाँजींग आंबटशौकींनासाठीचे अड्डे बनले आहेत. विवाहित महिला पुरुषासह महाविद्यालयीन तरुण तरुणी चक्क पाठीवरच्या दप्तरासह लाँजवर येतांना दिसतात त्यामुळे तरणाई वाममार्गाला लागत असल्याची ओरड होत आहे. काही लाँज तर नागरी वस्तीत असल्याने आजुबाजूचे व्यापारी आणि शेजारी असणाऱ्या महिला व पुरुष लाँजवर चालत असलेले अश्लील धंदे उघड्या डोळ्यांनी बघत असल्याने तिव्र संताप व्यक्त करत आहेत. पण लाँजमालक हे धनदांडगे असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार कोण करावी असा प्रश्न उपस्थित होत होता पण ग्रामपंचायतने पुढाकार घेतल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
नरसी येथील जवळपास सर्व लॉज चालकांनी भरपूर पैसा कमविण्यासाठी लॉजिंग-बोर्डिंग ऐवजी खुलेआम वेश्या व्यवसाय करण्यासाठी लाॅजचा वापर सुरू केला आहे. ह्या लॉज चालकांचे गावोगावी असलेले एजंट व्यवसाय करणाऱ्या महिलांना आणि ग्राहकांना या ठिकाणी आणतात. गावात ज्या-ज्या भागातील लॉजवर हा व्यवसाय चालतो त्या त्या भागातील महिला-मुलींना रस्त्यावर फिरणे अवघड झाले आहे. कारण वेश्यागमन करणारे आंबट शौकीन रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ घालतात. विशेष म्हणजे नरसी येथे रामतीर्थ पोलीस ठाण्याची चौकी आहे.
नरसी फाटा हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे सर्व बाबींची खडानखडा माहिती ठेवणाऱ्या पोलिसांना हा व्यवसाय माहीत नव्हता का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. वेश्या व्यवसायाचा उपद्व्याप बंद व्हावा यासाठी येथील जागरूक नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न केला होता ; परंतु लॉज चालकांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत व्यवसाय सुरूच ठेवला. वेश्या व्यवसायाचा अतिरेक झाल्यामुळे परवाच जागरूक ग्रामस्थांनी लाॅज चालकांना पोलिसा समक्ष बोलावून हा व्यवसाय बंद करण्यास सांगितले होते.
यावेळी झालेल्या बैठकीला सपोनि श्रीधर जगताप यांच्यासह सपोनि नरवाडे, सरपंच गजानन पाटील भिलवंडे, तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर वडगावे, माजी सरपंच इब्राहिम बेग पटेल, मोहन पाटील भिलवंडे, नजीर बागवान, राजू सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी लाँज मालक व चालकांना अक्षरशः धारेवर धरले आणि मनसोक्त तोंडसुख घेताना कुळाचा उध्दार केला. यावेळी उपस्थित असलेले पोलीस अधिकारी आणि प्रमुख स्थब्धपणे एकत होते. एवढ्या उध्दारानंतरही ‘चमडी बेच के दमडी’ कमवण्याच्या धंद्यात काहीच फरक पडला नाही. लाँज मालक व चालक प्रस्थापित व मातब्बर असल्याने आमचे कोण काय करतो या अविर्भावात वावरत आहेत.