ताज्या बातम्यानांदेडनायगांव

प्रशासनाचे आदेश हवेत विरले! ४०°C तापमानात नागरिक गॅससाठी रांगेत; नायगावमध्ये संताप

New Bharat Times नेटवर्क

नायगाव: एकीकडे सूर्याचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला असताना, दुसरीकडे नायगाव तालुक्यातील सामान्य जनतेला मात्र कडक उन्हात गॅस टाकीसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ‘गॅस घरपोच देण्याच्या’ दिलेल्या आदेशाला गॅस वितरकांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र सध्या नायगाव मध्ये पाहायला मिळत आहे.

सुमारे एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी महोदयांनी स्पष्ट आदेश दिले होते की, कोणत्याही नागरिकाला गॅस टाकीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज पडू नये, गॅस वितरण संस्थांनी गॅस घरपोच (Home Delivery) करावा. मात्र, या आदेशाला महिना उलटत नाही तोच परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे.

एप्रिल महिन्यातील जीवघेण्या उन्हात, जिथे पारा ४०°C वर पोहोचला आहे, तिथे नागरिक रस्त्यावर उभे राहून गॅस सिलिंडरची वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे, प्रशासकीय अधिकारी वातानुकूलित (AC) दालनात बसून असताना सामान्य जनता मात्र उन्हात होरपळत आहे, अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

​”जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढूनही त्याची अंमलबजावणी होत नसेल, तर या आदेशाचा उपयोग काय? जनता उन्हात होरपळत आहे आणि अधिकारी थंड हवेत बसले आहेत. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन घरपोच गॅस सेवा सुरू करावी.”

— साईनाथ पाटील मोरे देगावकर(छावा तालुकाध्यक्ष, नायगाव)

गॅस वितरकांच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, जिल्हा प्रशासनाने संबंधित गॅस एजन्सींवर कडक कारवाई करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker